ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी या सामन्याची सुरुवात खराब झाली व कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. केवळ दोन चेंडू आधी जीवदान मिळालेल्या रोहितला आपली खेळी मोठी करता आली नाही.
उपांत्य दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. सुरुवातीपासूनच चाचपडत खेळत असलेला दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने 8 चेंडूवर 2 धावा केल्या. या छोटेखानी खेळीतही त्याला जीवदान लाभले होते. तस्कीन अहमद टाकत असलेल्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितने आपला आवडता पुल फटका खेळला. त्यावेळी फाईन लेगवर उभ्या असलेल्या हसन मेहमूदने त्याचा अतिशय सोपा झेल सोडला. त्यानंतर सर्वच बांगलादेशी खेळाडू व प्रेक्षक नाराज झालेले दिसले.
डावाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या जीवनाचा फायदा घेण्याचा रोहितचा प्रयत्न होता. पुढील षटक टाकण्यासाठी झेल सोडलेला हसन मेहमूद आला. पहिल्या चेंडूवर रोहितने बचाव केला. मात्र, दुसरा चेंडू थर्ड मॅनच्या डोक्यावरून मारण्याच्या नादात रोहितने यासिर अलीच्या हाती सोपा झेल दिला.
विराट कोहलीसह भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज असलेला रोहित या विश्वचषकात फॉर्मशी झगडताना दिसतोय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही तो स्वस्तात बाद झाला होता. केवळ नेदरलँड्सविरूद्ध त्याला एक अर्धशतक झळकावण्यात यश आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाज पाहून चाहत्यांचीही वाढली चिंता
अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा