---Advertisement---

T20 Series: वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप करत कर्णधार रोहितने विराटला केले ओव्हरटेक, बनला ‘नंबर १’

On: रविवार, फेब्रुवारी 20, 2022 11:54 PM
ROHIT-VIRAT-ODI
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी (२० फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना झाला. भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला असून ३-० च्या फरकाने टी२० मालिकाही जिंकली आहे. यापूर्वी यजमानांनी वनडे मालिकेतही पाहुण्यांना व्हाईटवॉश दिला होता. या विजयासह भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठा किर्तीमान करत माजी कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले आहे.

या सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत अपेक्षित असा गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८४ धावा केल्या. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. त्याने अष्टपैलू वेंकटेश अय्यरला साथीला घेत सूर्यकुमारने वैयक्तिक ६५ धावा चोपल्या. ३१ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि एका चौकारासह त्याने ही खेळी केली. तर अय्यरनेही १९ चेंडूंमध्ये ३५ धावांची नाबाद खेळी केली.

भारताच्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना विशेष खेळी करता आल्या नाहीत. यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने चिवट झुंज दिली. तो ४७ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावा करून बाद झाला. परंतु त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे इतर फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत आणि वेस्ट इंडिजचा संघ ९ विकेट्स गमावत १६७ धावांवरच गारद झाला.

अशाप्रकारे हा सामना जिंकत रोहित मायदेशात सर्वाधिक टी२० सामने जिंकणारा भारताचा पहिला आणि जगातील चौथा कर्णधार बनला आहे. या विक्रमामध्ये त्याने विराटला मागे सोडले आहे. विराटच्या नावावर भारतात १३ टी२० सामना विजय आहेत. तर रोहितचा आकडा आता १४ वर गेला आहे. याबाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचसोबत बरोबरीवर आला आहे. फिंचच्या नावेही मायदेशात १४ टी२० सामना विजयांची नोंद आहे. तर इंग्लंडचा इयॉन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन यांच्या खात्यात सर्वाधिक १५ विजय आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने स्टाईलमध्ये अंपायर बिली बाउडेनलाही टाकले मागे, DRS मागतानाचा Video तुफान व्हायरल

ईडन गार्डन्सवर तळपला भारताचा ‘सूर्या’! वादळी खेळीसह केली सर्वोत्तम कामगिरी

VIDEO: सूर्याने मारलेला मनमोहक ‘गुडघा टेक’ षटकार पाहिला का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---