ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसावर पाहुण्या भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. सलामीवीर केएल राहुलने नाबाद शतक झळकावत पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. राहुलच्या शतकी खेळीनंतर त्याचा सलामीचा साथीदार रोहित शर्मा भलताच खूष दिसला. सामन्यानंतर बोलताना रोहितने राहुलचे तोंड भरून कौतुक केले.
ही राहुलची सर्वोत्कृष्ट खेळी
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात शतकी सलामी देत रोहित व राहुल या जोडीने भारताला सामन्यात फ्रंटफूटवर नेले. सामन्यानंतर आभासी पत्रकार परिषदेला सामोरे गेलेल्या रोहितने आपला शतकवीर साथीदार केएल राहुलचे मनापासून कौतुक केले. रोहित म्हणाला,
“मला विचाराल तर ही राहुलची आजवरची मी पाहिलेली सर्वोत्कृष्ट खेळी आहे. पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत तो नियंत्रणात दिसला. एकदाही तो भ्रमित वाटला नाही. त्याची रणनीती स्पष्ट होती. आज त्याचा दिवस होता आणि त्याने त्याचा फायदा घेतला.”
रोहितने या पत्रकार परिषदेत आपल्या व राहुलच्या भागीदारी विषयीदेखील प्रतिक्रिया दिली.
रोहित-राहुलची विक्रमी भागीदारी
रोहित शर्मा व केएल राहुल या जोडीने सलग दुसऱ्यांदा भारतीय संघासाठी उत्कृष्ट सलामी भागीदारी केली. पहिल्या सामन्यात ९७ धावांची सलामी दिल्यानंतर या सामन्यात दोघांनी एक पाऊल पुढे जात १२६ धावांची सलामी दिली. २०१७ नंतर विदेशात भारतीय सलामीवीरांकडून देण्यात आलेली ही पहिलीच शतकी सलामी ठरली. या भागीदारीमध्ये प्रथमता रोहितने प्रमुख भूमिका साकारताना ८३ धावांचे योगदान दिले होते. रोहित बाद झाल्यानंतर राहुलने ही जबाबदारी आपल्यावर घेत दिवसाखेर वैयक्तिक नाबाद १२७ धावा बनविल्या होत्या. दुसऱ्या दिवशी या शतकाचे रूपांतर मोठ्या धावसंख्येत करण्याचे आव्हान राहुल पुढे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत
ओहो! केएल राहुलच्या झुंजार शतकाचे प्रेयसी अथियाकडून कौतुक, व्हिडिओ शेअर करत लिहिले…