भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नजमुल शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या या संघानं नुकताच पाकिस्तानचा त्यांच्याच घरच्या मैदानावर 2-0 असा पराभव केला. ही आगामी मालिका भारतासाठीही महत्त्वाची असेल, कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर त्याचा मोठा परिणाम होईल. परंतु टीम इंडियासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा बांगलादेशविरुद्धचा खराब रेकॉर्ड.
रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्ध आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये तो 11 च्या मामूली सरासरीनं केवळ 33 धावा करू शकला आहे. ‘हिटमॅन’नं 2015 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याला केवळ एका डावात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यात तो शाकीब अल हसनच्या गोलंदाजीत 6 धावांवर क्लीन बोल्ड झाला. 2019 मध्ये भारताच्या बांगलादेश दौऱ्यात रोहितनं 2 कसोटी सामने खेळले, ज्याच्या 2 डावात त्यानं अनुक्रमे 6 आणि 21 धावा केल्या.
दुसरीकडे, एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला तर रोहित शर्माच्या बॅटनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यानं या संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 56.14 च्या उत्कृष्ट सरासरीनं धावा ठोकल्या. परंतु गोष्ट जेव्हा कसोटी क्रिकेटची येते, तेव्हा रोहित अपयशी ठरतो. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 2022 मध्येही कसोटी मालिका खेळली गेली होती. परंतु त्यावेळी रोहित अंगठ्याच्या दुखापतीमुळे मालिकेला मुकला होता.
बांगलादेशविरुद्ध जरी रोहितचा कसोटी रेकॉर्ड खराब असला, तरी 2024 मध्ये त्यानं या फॉरमॅटमध्ये भरपूर धावा कुटल्या. रोहितनं यावर्षी 6 कसोटी सामन्यांच्या 11 डावात 45 पेक्षा जास्त सरासरीनं 455 धावा केल्या आहेत. मागील पाच डावांबद्दल बोलायचं झालं तर, रोहितनं यामध्ये 2 शतकं आणि एक अर्धशतक झळकावलंय.
हेही वाचा –
श्रीलंकेच्या फलंदाजाचा धमाका, कसोटी क्रिकेटमधील एका खास विश्वविक्रमाची बरोबरी
आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियमांमध्ये बदल व्हायला हवेत? दोन दिग्गजांचं मोठं वक्तव्य
भारतीय कसोटी संघाच्या यशात कोणाचा वाटा मोठा? गंभीर-विराटनं यांना दिलं श्रेय