भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय सलामीवीरांना सूर सापडला नव्हता. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहितला सूर सापडला आणि भारतीय संघाने दिमाखात विजय प्राप्त केला. सध्या क्रिकेट विश्वात रोहित शर्माचे नाव मोठ्या खेळाडूंमध्ये गणले जाते. २००७ पासून आतापर्यंत त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सुमारे ३८० सामने खेळून देशासाठी १५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानातही त्याच्या नावावर अनेक मोठ्या कामगिरीची नोंद आहे. दरम्यान, भारतीय उपकर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी झालेल्या संवादात एक अतिशय रंजक बातमी उघड केली आहे.
भारतीय संघांमध्ये पदार्पण केल्यापासून भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा ४५ क्रमांकाची जर्सी वापरताना दिसत आहे. तो फक्त ४५ नंबरची जर्सी का घालतो? याचा खुलासा त्याने आयसीसीच्या व्हिडिओमध्ये केला आहे. रोहित शर्माचे म्हणणे आहे की, यामागे काही खास कारण नाही, फक्त त्याच्या आईला हा नंबर आवडतो, म्हणून तो ४५ क्रमांकाची जर्सी वापरतो.
रोहित शर्माने व्हिडिओमध्ये खुलासा करत म्हटले आहे की, ‘भारतीय संघात आल्यानंतर मला अनेक नंबर दाखवण्यात आले. त्यानंतर मी माझ्या आईला विचारले की माझ्यासाठी कोणता नंबर चांगला असेल? यावर माझ्या आईने उत्तर दिले की ४५ नंबरची जर्सी माझ्यासाठी सर्वोत्तम असेल. तेव्हापासून मी या क्रमांकाची जर्सी वापरत आहे.’
https://www.instagram.com/p/CV4SvXmL-_K
रोहित शर्माने भारतीय संघासाठी ४३ कसोटी क्रिकेट सामने खेळताना ७४ डावांमध्ये ४६.९० च्या सरासरीने ३०४७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८ शतके आणि १४ अर्धशतके आहेत. याशिवाय, त्याने देशासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२७ सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटच्या २२० डावांमध्ये ४९.० च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत.
याशिवाय रोहितने ११४ टी२० क्रिकेट सामने खेळले आहेत, टी२० च्या १०६ डावांमध्ये ३२.४० च्या सरासरीने २९५२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –