भारत आणि हाँगकाँग संघात बुधवारी (31 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेला आशिया चषक 2022 मधील सामना रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 192 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 152 धावाच करू शकला. परिणामी भारताने 40 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह भारताने सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघाच्या या कौतुकास्पद कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय संघाच्या (Team India) विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव याचे कौतुक केले आहे. तसेच भारतीय संघ कुठे कमी पडतोय याबद्दलही तो बोलला आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या (Hongkong vs India) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचे सलामीवीर विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत. मात्र मधल्या फळीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सांभाळला. विराटने 44 चेंडूत 3 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तसेच सूर्यकुमारनेही 26 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची झंझावाती खेळी केली. सूर्यकुमारला त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) प्रदर्शनाचे कौतुक करताना विद्यमान कर्णधार रोहित म्हणाला की, “आम्ही सुरुवातीला खूप चांगली फलंदाजी केली आणि चांगली धावसंख्या उभा केली. सूर्यकुमारने ज्याप्रकारची खेळी केली, त्यासाठी शब्द कमी पडतील. तो निर्भीड होऊन फलंदाजी करत होता, ज्याची संघाचा अपेक्षा होती. आज त्याने काही असे शॉट खेळले, जे कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाहीत.”
सूर्यकुमारच्या प्रदर्शनाने जरी रोहित खुश असला तरीही भारतीय गोलंदाजांकडून त्याला आणखी अपेक्षा असल्याचे त्याने म्हटले आहे. आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांना फक्त 5 विकेट्स घेता आल्या. अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे महागडे गोलंदाज ठरले. त्यांनी आपल्या 4 षटकांमध्ये अनुक्रमे 44 आणि 53 धावा दिल्या.
याबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “आम्ही फलंदाजीची सुरुवात चांगली केली, परंतु गोलंदाजीत कमी पडलो. आम्ही गोलंदाजीत आणखी चांगले प्रदर्शन करू शकलो असतो.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचं फळफळलं नशीब, टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड
मुझसे शादी करोगी? हाँगकाँगच्या क्रिकेटरने भर स्टेडियममध्ये प्रेयसीला केले प्रपोज, उत्तर मिळालं…
हॉंगकॉंगवर एकतर्फी मात करत टीम इंडिया थाटात ‘सुपर फोर’मध्ये! सूर्या-विराट विजयाचे शिल्पकार






