भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून रोहितने आपल्या चाहत्यांसाठी एक मेसेज दिला आहे.
मुंबई इंडियन्सने रोहितने (Rohit Sharma) दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून ट्वीट केले की, “तुम्हाला प्रत्येक वेळी मैदानावर जाऊन विजयी व्हायचे असते. परंतु विश्वचषक हे प्रत्येकाचे ध्येय आहे. मला विश्वचषक जिंकायचे आहे.”
"Every time you go out there you want to win every game but the World Cup is the pinnacle of everything. I want to win World Cups." – @ImRo45#OneFamily pic.twitter.com/BOYshThWFd
— Mumbai Indians (@mipaltan) April 26, 2020
मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य सामन्यापर्यंत मजल मारली होती. या विश्वचषकात रोहितने १ किंवा २ नव्हे तर तब्बल ५ शतके ठोकली होती. परंतु दुर्दैवाने उपांत्य सामन्यात रोहित केवळ १ धावेवर बाद झाला होता. तसेच भारताला न्यूझीलंडने १८ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाला २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवता आला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीतील तीनही फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नव्हती. यामध्ये केएल राहुल (KL Rahul), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे खेळाडू प्रत्येकी केवळ १ धाव करून बाद झाले होते. त्यामुळे भारतीय संघाच्या पुढच्या फलंदाजांवर दबाव आला होता.
तरीही यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) काही प्रमाणात भारतीय संघाचा डाव सांभाळला होता. परंतु धोनी धावबाद झाल्यानंतर भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले होते.
रोहित याआधी २००७ टी२० विश्वचषकाच्या विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला आहे. मात्र वनडे विश्वचषक त्याला अजून जिंकता आलेला नाही. २०१५ आणि २०१९ या दोन्ही विश्वचषकासाठी त्याचा भारतीय संघात समावेश होता. पण भारतीय संघाला उपांत्य सामन्यातच पराभव स्विकारावा लागल्याने तिसरा वनडे विश्वषचक जिंकण्याचे स्वप्न साकारता आले नाही. त्यामुळे परिणामी रोहितलाही वनडे विश्वचषक जिंकता आलेला नाही.
आता २०२३मध्ये वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. अशामध्ये रोहित आपले स्वप्न पूर्ण करतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
रोहित सध्या आयपीएलमधील फ्रंचायझी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने ४ विजेतेपद मिळवले आहे.
वाचनीय लेख-
-क्रिकेटमधील ‘हे’ अतरंगी नियम जे क्रिकेट फॅन्सला सहसा नसतात माहित
-४७ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…