रांची येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची मालिका देखील जिंकली आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकांत ३ बळींच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताकडून सलामीवीर केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची शानदार खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीनंतर रोहित शर्माने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० हुन अधिक धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तो आता विराट कोहलीसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. दोघांनी २९ वेळा हा पराक्रम केला आहे. रोहितने यादरम्यान चार शतके देखील लगावली आहेत. तिसऱ्या स्थानी बाबर आझम आहे त्याने २५ वेळ ५० हुन अधिक धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. चौथ्या स्थानी असलेल्या डेविड वॉर्नरने २२ वेळा ५० हुन अधिक धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. निव्वळ अर्धशतकांचा विचार केला तर विराट कोहलीने २९ वेळा तर रोहित शर्माने २५ वेळा अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीवीर केएल राहुलने ६५ धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची अर्धशतकी खेळी खेळली. दोघांनीही ११७ धावांची सलामी भागीदारी केली. ही भागीदारी टीम साऊदीने मोडली. त्याने दोन्ही भारतीय सलामीवीरांना बाद केले. साऊदीने केएल राहुलला ग्लेन फिलिप्सकरावी झेलबाद केले. डावाच्या १६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने रोहितला मार्टिन गप्टिलकरवी झेलबाद केले. राहुलने ४९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार तर रोहितने ३६ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकार ठोकले. सूर्यकुमार यादव १ धावा करून साऊदीचा बळी ठरला. रिषभ पंतने नीशमच्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. पंत आणि व्यंकटेश अय्यर १२-१२ धावांवर नाबाद परतले.