रांची | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकांत ३१४ धावांचे लक्ष दिले आहे. सध्या भारतीय संघाच्या ८.३ षटकांत ३ बाद ३१ धावा झाल्या आहेत.
आजही भारतीय सलामीवीर पुर्णपणे अपयशी ठरले आहेत. शिखर धवन १० चेंडूत १ धाव करुन तर रोहित शर्मा १४ चेंडूत १४ धावा करुन तंबूत परतला आहे.
सलग ५व्या सामन्यात भारतीय सलामीवीरांना मोठी सलामी देण्यात अपयश आले आहे. ११, ०, ४, ८ आणि २१ अशा सलामीवीरांनी गेल्या ५ सामन्यात भागीदारी केल्या आहेत.
शिखर धवनने गेल्या ८ आंतरराष्ट्रीय सामन्यात २१, ०, १४, ५, ३०, २९, ६, १३ आणि २८ अशा खेळी केल्या आहेत. यातील वनडेत त्याने २१, ०, १४, ६ आणि १३ अशा खेळी केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूला रोहित शर्मालाही विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्यानेही गेल्या ८ आंतरराष्ट्रीय सामन्यात ०, ३७, ५, ३८, ५०, १, २ आणि ७ अशा खेळी केल्या आहेत. तर केवळ वनडेतील गेल्या ५ डावात ०, ३७, ५, २ आणि ७ धावांच्या खेळी केल्या आहेत.
२०१९मध्ये रोहितने ११ वनडे सामन्यात ३६.८१च्या सरासरीने ४०५ तर शिखऱ धवनने ११ सामन्यातच २६.५०च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत.
विश्वचषकापुर्वी भारतीय संघाला आता जेमतेम २ आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळणार असल्यामुळे संघव्यवस्थापनाचे मात्र चांगलेच टेन्शन वाढले आहे.
त्यात चौथ्या क्रमांकावरील रायडूलाही फाॅर्म गवसत नाही. त्याने १० सामन्यात ३०.८७च्या सरासरीने यावर्षी २४७ धावा केल्या आहेत.
जर मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसती तर भारताला यावर्षी न्यूझीलंडविरुद्धची तसेच सध्या सुरु असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका देखील गमवावी लागली असती.