भारतीय कर्णधार रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संपली असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर सायमन कॅटिच यांनी व्यक्त केलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यातून रोहितनं माघार घेतली होती. अशा स्थितीत त्याच्या निवृत्तीच्या बातम्या येत होत्या. मात्र आपण कुठेही जात नसल्याचं सांगत रोहितनं या सर्व बातम्या फेटाळून लावल्या. यावर सायमन कॅटिच यांनी बोचरी टीका केली आहे. “रोहित शर्माचं भविष्य आता क्रिकेटऐवजी स्टँड-अप कॉमेडीमध्ये आहे”, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली.
बीजीटी ब्रॉडकास्टरशी बोलताना सायमन कॅटिच म्हणाले, “तुम्ही रोहितची आकडेवारी पाहिली तर ती धक्कादायक आहे. आम्ही ते या कसोटी सामन्यादरम्यान पाहिले. त्याला कसोटीतून वगळलं जाणं अत्यंत निस्वार्थी होतं. मी तो इंटरव्ह्यू पाहिला. रोहित त्यात खूप छान बोलला. क्रिकेटनंतर त्याचं भविष्य स्टँडअप कॉमेडीमध्ये आहे, यात अजिबात शंका नाही. त्याची विनोदबुद्धी खूप चांगली आहे”, अशा शब्दांत कॅटिच यांनी रोहितला टोमणा मारला.
अखेरच्या कसोटीतून रोहित शर्मानं माघार घेतली असली, तरी याचा फायदा भारतीय संघाला झाला नाही. त्याच्या जागी टीममध्ये आलेला शुबमन गिल दोन्ही डावांत फ्लॉप झाला. सिडनी कसोटीत टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. अशाप्रकारे भारताने ही मालिका 3-1 ने गमावली.
रोहित शर्माबद्दल बोलताना कॅटिच पुढे म्हणाले, “त्याला 37 व्या वर्षी पुन्हा खेळण्याची भूक आणि इच्छा आहे की नाही हे फक्त त्यालाच माहीत आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका सोपी राहणार नाही. त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान गोलंदाज आहेत. गस ॲटकिन्सन आणि ब्रायडन कॉर्स चांगली कामगिरी करत आहेत. जर रोहित शर्मानं या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आणि निवडकर्त्यांनी त्याची निवड केली, तर त्याच्यासाठी हा दौरा कठीण असेल. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या 5 डावांत 31 धावा ही अत्यंत लाजिरवाणी कामगिरी असल्याची टीका कॅटिच यांनी केली.
हेही वाचा –
‘लेडी झहीर खान’ने केले क्रीडामंत्र्यांना क्लीन बोल्ड, व्हायरल VIDEO सोशल मीडियावर चर्चेत
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? स्पर्धेचे ‘कट-ऑफ’ डेट समोर
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले