आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ 50 धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली.
सर्व क्रिकेटप्रेमींना रंगतदार सामन्याची अपेक्षा असताना या सामन्यात श्रीलंका संघ अजिबात लढत देऊ शकला नाही. केवळ 50 धावांमध्ये सर्व बाद झाल्यानंतर भारतीय संघाने 6.1 षटकात विजय साजरा केला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,
“ही एक उत्कृष्ट सांघिक कामगिरी होती. अशा प्रकारचा विजय तुमचे चरित्र ठरवते. स्लीपमध्ये उभे राहून मला दिसत होते की, आमचे वेगवान गोलंदाज किती मेहनत घेत आहेत. सिराजला याचे श्रेय द्यावे लागेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांनी आपले योगदान दिले. आशिया चषकानंतर आता पुढचे लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि वनडे विश्वचषक असेल.”
भारतीय संघाला यानंतर आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल.
आशिया चषक अंतिम सामन्याचा विचार केल्यास, नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेले सहा बळी तर हार्दिक पंड्या याने घेतलेले तीन बळी यामुळे यजमान संघाचा डाव केवळ 50 धावात आटोपला. त्यानंतर शुबमन गिल व ईशान किशन या भारताच्या सलामी जोडीने हे आव्हान पार करून देत दहा गड्यांनी विजय साजरा केला.
(Rohit Sharma Statement After Asia Cup Win)