ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान स्वीकारेल. हा सामना ऍडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा पत्रकारांना सामोरा गेला. त्याने या अतिमहत्त्वाच्या सामन्याआधी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा याने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत दिले. त्याने या उपांत्य सामन्याबद्दल बोलताना म्हटले,
“उद्या मैदानात उतरणारे दोन्ही संघ समतोल आहेत. आम्ही खेळाच्या या प्रकाराला चांगल्या पद्धतीने ओळखतो. यावर्षीच इंग्लंडमध्ये आम्ही इंग्लंडला हरवण्याची किमया केली होती. त्या मालिकेपासून आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“या संपूर्ण विश्वचषकात आम्ही उत्कृष्ट खेळ केला आहे. आता केवळ त्याच गोष्टींवर टिकून राहण्याची गरज वाटते. एक मजबूत गोलंदाजी विरुद्ध चांगली गोलंदाजी असा हा सामना असेल. हा सामना करा अथवा मरा असा असेल. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करू. या सामन्यात पराभूत झालो तरी, मागील वर्षभरापासून घेतलेली मेहनत यामुळे कमी होती असे म्हणता येणार नाही.”
उपांत्य सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
उपांत्य सामन्यासाठी इंग्लंडची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
जोस बटलर (कर्णधार), ऍलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, ख्रिस वोक्स.
(Rohit Sharma Statement In Pre Match Press Conference)