बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 280 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अश्विन, जडेजा, शुबमन गिल आणि रिषभ पंत भारताच्या विजयाचे नायक म्हणून उदयास आले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत फारशी चागली कामगिरी करू शकला नाही, मात्र त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदला गेला आहे.
वास्तविक, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा जगातील चौथा खेळाडू बनला आहे. या बाबतीत त्यानं महान सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात विजय मिळवणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. त्यानं एकूण 377 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवलाय.
या लिस्टमध्ये श्रीलंकेचा महेला जयवर्धने 336 आंतरराष्ट्रीय विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील विराट कोहलीनं 322 आणि रोहितनं 308 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत 307 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे खेळाडू
377 – रिकी पाँटिंग
336 – महेला जयवर्धने
322 – विराट कोहली*
308 – रोहित शर्मा*
307 – सचिन तेंडुलकर
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं 280 धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 515 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हसन शांतोनं सर्वाधिक 82 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विननं सहा आणि रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या.
सामन्यात 113 धावा आणि 6 विकेट घेणाऱ्या अश्विनला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
WTC: गुणतालिकेत टीम इंडियाला बंपर फायदा, बांग्लादेशला 440 व्होल्टचा धक्का!
‘द रेकाॅर्ड मॅन’, चेन्नई कसोटीत अश्विनची अष्टपैलू कामगिरी, विक्रमांचा पाऊस!
चेन्नई कसोटीत भारताचा शानदार विजय; आर अश्विनचा डबल धमाका, बॅटिंगपाठोपाठ बॉलिंगमध्येही कमाल!