टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. आता भारतीय संघाचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सततच्या क्रिकेटमुळे आलेल्या मानसिक थकव्यावर खुलेपणाने मत व्यक्त केले. दीर्घकाळ घरापासून दूर राहिल्यामुळे असे घडते, आजकाल इतके क्रिकेट खेळले जात आहे की, सतत खेळल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात, असे रोहित शर्माचे मत आहे.
रोहित शर्माने म्हटले की, टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम पाकिस्तानने भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर न्यूझीलंडनेही आठ गडी राखून पराभव केला. भारताचे फलंदाजही धावा करण्यात अपयशी ठरले.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने भारतीय संघाची कमकुवत बाजू उघड केली. तो म्हणाला, ‘या सामन्यातील दृष्टिकोन वेगळा होता. आम्ही पहिल्या दोन्ही सामन्यात असे खेळू शकलो असतो, तर खूप बरे झाले असते, पण तसे झाले नाही. जेव्हा आम्ही बराच काळ घरापासून दूर असतो, तेव्हा असे घडते. काहीवेळा निर्णय चुकतात आणि पहिल्या दोन सामन्यांमध्येही असेच घडले.’
रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आजकाल खूप क्रिकेट खेळलं जातंय आणि आम्हीही खूप क्रिकेट खेळतोय. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा जेव्हा मैदानात जाता, तेव्हा तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या व्यवस्थित राहाल याची काळजी घ्यावी लागेल. यामुळेच आपण बऱ्याचदा चांगले निर्णय घेऊ शकत नाही. भरपूर क्रिकेट खेळल्यानंतर अशा गोष्टी घडतात. अनेक वेळा खेळापासून अलिप्त राहून मानसिक ताजेतवाने व्हावे लागते. पण जेव्हा तुम्ही विश्वचषक खेळत असता तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशावेळी काय करावे आणि काय करू नये, हे आपल्याला माहित असले पाहिजे.’
रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्ही दोन सामन्यांत चांगले खेळू शकलो नाही. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही एका रात्रीत खराब खेळाडू बनलो. याचा अर्थ असाही नाही की खेळ चालवणारे सर्व खेळाडू निरुपयोगी आहेत. तुम्ही आत्मपरीक्षण करून परत या आणि आम्ही तेच केले. अशा परिस्थितीत तुम्ही निर्भय राहिले पाहिजे आणि बाहेर काय चालले आहे, याकडे लक्ष दिले नाही पाहिजे. आमच्याकडे खूप चांगला संघ आहे, जो फक्त दोन सामन्यांमध्ये चांगला खेळ करू शकला नाही.’
भारताचा टी२० विश्वचषकातील पुढील सामना ५ नोव्हेंबरला स्कॉटलंड विरुद्ध खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘प्रशिक्षक’ राहुल द्रविड मिळवून देऊ शकतो ‘विश्वचषक’, पण पार करावी लागतील ‘ही’ पाच आव्हाने
‘विराट कोहलीला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बघायला आवडेल’, स्कॉटलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली इच्छा