मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळण्याऐवजी रोहित शर्मानं यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. मात्र, असं करूनही तो फ्लॉप ठरला. रोहित 5 चेंडूत केवळ 3 धावा करून बाद झाला. या मालिकेत त्यानं आतापर्यंत केवळ 22 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता रोहितची कामगिरी आणि त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. नव्या रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील ही शेवटची मालिका ठरू शकते.
रोहित शर्मानं गेल्या 8 कसोटी सामन्यात 11.07 च्या सरासरीनं केवळ 155 धावा केल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या मेलबर्नमध्ये असून ते रोहित शर्माशी त्याच्या कसोटी क्रिकेटमधील भविष्याबद्दल बोलण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत पराभूत झाल्यानंतर जर टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरू शकली नाही, तर ही रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरू शकते, असं या अहवालात म्हटलं आहे.
रोहित शर्मा पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं सलामीची जबाबदारी घेतली होती. राहुल आपल्या फलंदाजीनं छाप पाडण्यात यशस्वी ठरला. याच कारणामुळे रोहित दुसऱ्या कसोटीसाठी संघात आला तेव्हा त्यानं ओपनिंगऐवजी 6 व्या क्रमांकावर खेळणं पसंत केलं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतही रोहितला धावा करता आल्या नाहीत.
यानंतर त्यानं चौथ्या कसोटीत सलामीला येण्याचा निर्णय घेतला. राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळता यावं म्हणून शुबमन गिलला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आलं. मात्र ओपनिंग करतानाही रोहितची बॅट शांत राहिली आणि पॅट कमिन्सनं त्याला 3 धावांवर आपला शिकार बनवलं. रोहितची खराब कामगिरी पाहून सोशल मीडियावर काही चाहते त्याच्या निवृत्तीची मागणी करत आहेत. आता निवड समिती या परिस्थितीत काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं केल्या या 3 मोठ्या चुका
IND vs AUS; “तुम्ही विकेटवर टिकून…” रोहित शर्मावर दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस, तब्बल 20 वर्षांनंतर घडलं असं काहीतरी!