इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (27 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाने मजबूत स्थिती गाठली आहे. लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 215 धावा केल्या आहेत आणि अजूनही भारत इंग्लंडपेक्षा 139 धावांनी मागे आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा करून मोठी आघाडी घेतली होती. भारताचा पहिला डाव 78 धावांवर संपुष्टात आला होता.
सामन्याचा चौथा दिवस भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघ चौथ्या दिवशी कोणत्या नियोजनानुसार खेळेल?, याचा खुलासा सलामीवीर रोहित शर्माने केलेला आहे.
भारतीय संघाचे पहिले लक्ष्य 139 धावांचे अंतर कमी करणे, हे आहे. संघाचे पुढील फलंदाजीचे नियोजन अनेक घटकांवर अवलंबून असेल, ज्यात उर्वरित षटकांची संख्या देखील समाविष्ट असेल, असे रोहितचे म्हणणे आहे.
तो म्हणाला की, “आम्ही अजूनही इंग्लंडपेक्षा 139 धावांनी मागे आहोत. म्हणून आधी आम्हाला हे अंतर कमी करण्याची गरज आहे आणि मग आम्ही आघाडीचा विचार करू. आम्हाला आधी हे अंतर पार करण्यासाठी योजना करावी लागेल. मग खेळाच्या स्थितीचा आढावा घेऊन आपल्याकडे किती षटके शिल्लक आहेत याचा विचार करावा लागेल. मग आम्ही पुढील योजना करू. आशा आहे की, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा आणि इतर फलंदाज जास्त वेळ फलंदाजी करू शकतील.”
रोहित पुढे म्हणाला की, “भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात पूर्णपणे बेजबाबदार फटके खेळले. पण दुसऱ्या डावात झालेली चूक सुधारली. आम्ही पहिल्या डावात खराब फलंदाजी केली. इंग्लंडने खरोखरच काही चांगले चेंडू टाकले. परंतु ही 78 धावांवर सर्वबाद होणारी खेळपट्टी निश्चितच नव्हती. आम्ही मान्य करतो की आम्ही सुरुवातीला खराब फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात आम्ही आमच्या चुका सुधारल्या. म्हणूनच आम्ही आता या स्थितीत आहोत.”
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 181 चेंडूंत 91 धावांवर नाबाद आहे. गेल्या 36 डावांमध्ये त्याची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कोहलीने 94 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या आहेत. या दोघांनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी 99 धावा जोडल्या आहेत. पुजाराने याआधी रोहित शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करून सुरुवातीच्या धक्क्यातून संघाला सावरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टंप्स कुठे? चेंडू कुठे? वादग्रस्त अंपायर्स कॉलमुळे रोहित तंबूत, चाहत्यांसह पत्नी रितीकाही संतप्त
Video: दमदार अर्धशतकानंतर रोहित दुर्दैवीपणे बाद, रिव्ह्यू घेऊनही झाला नाही उपयोग
‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान