भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फिरकीपटू युझवेंद्र चहल मंगळवारी (२२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकला. नृत्य दिग्दर्शिका धनश्री वर्मासोबत त्याने लगीनगाठ बांधली. कुटुंबीय आणि अगदी जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. चहलने स्वतः इंस्टाग्रामद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर, अनेकांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. भारताचा सलामीवीर व मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने देखील चहलला लग्नाच्या शुभेच्छा देत ट्रोलदेखील केले.
सहकाऱ्यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
मंगळवारी उशीरा चहलने आपल्या लग्नाची बातमी सार्वजनिक केली. गुरूग्राममध्ये हा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या, केदार जाधव तसेच वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल यांनीदेखील नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
रोहित शर्माने शुभेच्छा देत केले ट्रोल
भारताचा सलामीवीर व चहलचा अगदी जवळचा मित्र असलेल्या रोहित शर्माने देखील ट्विटरवरून चहलचा ट्वीट रिट्विट करत दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन भावा, दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा. तू तुझ्या गुगली तिला न टाकता विरोधी संघांसाठी राखून ठेव.’
Congratulations bro, best wishes to both of you. Keep those googlies for opposition not her 😉 https://t.co/LJFWnLhYbA
— Rohit Sharma (@ImRo45) December 23, 2020
रोहित ऑस्ट्रेलियात पूर्ण करतोय क्वारंटाईन कालावधी
रोहित सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. रोहित दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला उशिराने दाखल झाला होता. परिणामी, त्याला १४ दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. तो ३० डिसेंबर रोजी संघासोबत सामील होईल. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात भारतीय संघात सलामीवीर म्हणून खेळताना दिसू शकतो.
चहलची पत्नी आहे नृत्य दिग्दर्शिका
युझवेंद्र चहल भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित सदस्य आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या वनडे व टी२० मालिकेत त्याची कामगिरी संमिश्र राहिली होती. मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात ‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ येऊन सामनावीर पुरस्कार पटकवण्याचा मान त्याला मिळाला होता. चहलची पत्नी धनश्री ही नृत्य दिग्दर्शिका (कोरिओग्राफर), यूट्यूबर आणि डॉक्टर आहे. ती सातत्याने सोशल मीडियावर दिसत असते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार’, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने
“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”
“अश्विन जागतिक किर्तीचा गोलंदाज”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली प्रशंसा