वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. यामुळे भारतीय संघाची मालिका क्लीन स्वीप करण्याची संधी हुकली. असे असतानाच सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने एक तीन शब्दांचे ट्विट करत चर्चेला उधाण आणले.
Mumbai ya Trinidad 🤔🌧️ pic.twitter.com/jOPINPXW4a
— Rohit Sharma (@ImRo45) July 25, 2023
भारतीय संघाला मालिकेतील सलग दुसरा विजय साजरा करण्याची चांगली संधी होती. अखेरच्या दिवशी केवळ आठ बळींची आवश्यकता असताना पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. अखेरच्या दिवशी पाच तास प्रतीक्षा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला. हा सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्राम हॅण्डलवर एक फोटो शेअर करत प्रश्न विचारला,
‘मुंबई या त्रिनिदाद’
त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
मुंबईचा पाऊस हा सातत्याने चर्चेचा विषय असतो. त्याच पार्श्वभूमीवर रोहितने हे ट्विट केल्याने अनेकांनी त्याला तो खरा मुंबईकर असल्याचे संबोधले. तर काहींनी अर्धा संघ मुंबईचाच असल्याने त्याने असे ट्विट केल्याचे म्हटले.
सध्या भारतीय संघात मुंबई व मुंबई इंडियन्स यांचे बरेच खेळाडू दिसून येतात. स्वतः कर्णधार रोहित मुंबईचा असून तो मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतो. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा देखील मुंबईचा आहे. तसेच या संघात ईशान किशन हा मुंबई इंडियन्ससाठी खेळणारा खेळाडू देखील आहे. या व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल व शार्दुल ठाकूर हे देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.
(Rohit Sharma Tweet On Mumbai And Trinidad)