जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून इंग्लंड येथील एजबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपचा मानकरी कोणता संघ होणार याचा निकाल या सामन्यात लागेल. अंतिम फेरीत पोहोचलेले दोन्ही संघ विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत. यासोबतच काही भारतीय खेळाडूंना वैयक्तिक विक्रम करण्याची देखील संधी मिळणार आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे यांच्याकडे या चॅम्पियनशिपमधील मोठा विक्रम करण्याची संधी चालून आली आहे.
हा विक्रम होऊ शकतो रोहित शर्माच्या नावे
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे जवळपास नक्की झाले आहे. रोहित हा सामना खेळल्यास त्याच्याकडे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत स्पर्धेत ११ सामने खेळताना १७ डावांमध्ये २७ षटकार घेतले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याची कामगिरी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने केली आहे. स्टोक्सने या चॅम्पियनशिपमध्ये १७ सामन्यांच्या ३२ डावांमध्ये ३१ षटकार लगावले आहेत. इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत नसल्याने रोहितला पाच षटकार मारून या यादीत पहिल्या क्रमांकावर जाण्याची सुवर्णसंधी आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडूंच्या यादीत भारताचा मयंक अगरवाल तिसऱ्या स्थानी आहे. मयंकने आत्तापर्यंत स्पर्धेत १२ सामन्यांच्या २० डावांमध्ये २० षटकार ठोकले आहेत. अंतिम फेरीत त्याला संधी मिळाल्यास तो मोठी खेळी करून हा विक्रम देखील आपल्या नावे करू शकतो. या यादीमध्ये भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर असून त्याने ११ सामन्यांच्या १८ डावांमध्ये १६ वेळा चेंडू षटकारापार घालवला आहे. पाचव्या स्थानी इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर असून त्याने १४ षटकार ठोकले आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया
क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन