मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने 114 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 चौकार मारले. हे रोहितचे 2018 वर्षातील कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक आहे.
त्याचबरोबर रोहितचा हा या वर्षीतील चौथा कसोटी सामना आहे. त्याने यावर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामने खेळले होते. त्यानंतर त्याला भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले होते.
पण पुन्हा एकदा रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्यानेही या संधीचे सोने करताना आज नाबाद अर्धशतक केले आहे.
रोहितने यावर्षी 4 कसोटी सामन्यात 29.83 च्या सरासरीने 179 धावा केल्या आहेत. यात आजच्या अर्धशतकाचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे आज केलेल्या अर्धशतकी खेळीत रोहितने एकही षटकार मारलेला नाही. हे त्याचे एकही षटकार न मारता केलेले पहिले अर्धशतक आहे.
रोहितने या सामन्यात पहिल्या डावात अजिंक्य रहाणेबरोबर पाचव्या विकेटसाठी 62 तर पंतबरोबर सहाव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचत भारताला 400 धावांचा टप्पा पार करुन दिला आहे.
रोहितने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत 27 कसोटी सामन्यात 40.51 च्या सरासरीने 1580 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचा आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनीला डच्चू पक्का होता, परंतु या कारणामुळे झाली निवड
–चुकीला माफी नाही? मयांक अगरवालची त्या व्यक्तीने मागितली माफी
–वाचा पहिला डाव घोषीत करण्याचा कोहलीचा निर्णय चूक की बरोबर