रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर अनेक विक्रम आहेत, पण त्यातील एक विक्रम आता लवकरच मोडला जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि 2024 चा टी20 विश्वचषक विजेता रोहित शर्माच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. मात्र, आता यूएई (UAE) चा फलंदाज त्याच्या या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या वर्षाच्या विश्वचषकात हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 159 सामन्यात 205 षटकार लगावले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 हून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव आणि पहिला फलंदाज आहे. विशेष म्हणजे, 2007 पासून 2024 पर्यंतचे सर्व टी20 विश्वचषक खेळल्यानंतर रोहितने निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे त्याच्या षटकारांची संख्या आता स्थिर आहे.
आता रोहितच्या या विक्रमाला यूएईचा स्फोटक फलंदाज मोहम्मद वसीम कडून आव्हान मिळत आहे. वसीमने आतापर्यंत 54 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 193 षटकार मारले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी वसीमच्या नावावर 190 षटकार होते. या सामन्यात त्याने 45 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली, ज्यात 3 षटकारांचा समावेश होता. यामुळे त्याची एकूण षटकारांची संख्या आता 193 झाली आहे. रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आता फक्त 13 षटकारांची गरज आहे.
मोहम्मद वसीम (Mohmmed Wasim) यूएईचा असा पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने 2022 आणि 2026 टी20 विश्वचषकात दोनदा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. सलामीला येऊन 20 ओव्हरपर्यंत नाबाद राहून त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली आहे. वसीमच्या फटकेबाजीमुळेच यूएईने न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाविरुद्ध 20 षटकांत 173 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.






