पुणे : महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, आसाम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना नेहरू स्टेडीयम, गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे.
मुलांच्या गटाच्या लढतीत महाराष्ट्र संघांने झारखंड संघाला ९-१ असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र संघाकडून मिहीर सानेने ३, योगेश तायडे व सौरभ भालेराव यांनी प्रत्येकी २ तर, भार्गव घारपुरे व संजोग तापकीर यांनी प्रत्येकी १ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाता उचलला. झारखंड संघाकडून एकमात्र गोल मुकेश मुखीने केला. मध्यंतराला महाराष्ट्र संघाने ६-० अशी आघाडी घेतली होती.
मुलांच्या गटात जम्मू काश्मीर संघाने कर्नाटक संघाला ३-१ असे पराभूत करताना उपांत्य फेरी गाठली. जम्मू काश्मीर संघाकडून भानू खजुरियाने २ तर अमरीतपाल सिंगने १ गोल केला. कर्नाटक संघाकडून जय सडेकरने १ गोल नोंदविला. मध्यंतराला कर्नाटक संघाने १-० अशी आघाडी घेतली होती. मुलांच्या गटाच्या उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला ११-१ असे एकतर्फी पराभूत करताना उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.
मुलींच्या गटाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघाला ५-० असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार मानसी मारणे व श्वेता कदम यांनी प्रत्येकी २ तर सुमेधा बोराडेने १ गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. छत्तीसगड संघाला एकाही गोल नोंदवता आला नाही. मध्यंतराला महाराष्ट्र संघाने २-० अशी आघाडी घेतली होती.
मुलींच्या गटात राजस्थान संघाने मध्य प्रदेश संघाला ५-१ असे पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. राजस्थान संघाकडून रिंकू सोनीने ३ तर पूजा चौधरी व के. तन्वीने प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघासमोर जम्मू काश्मीर संघाचे तर उत्तर प्रदेश संघासमोर आसाम संघाचे आव्हान असणार आहे. मुलींच्या गटात महाराष्ट्र संघासमोर आसाम संघाचे तर राजस्थान संघासमोर जम्मू काश्मीर संघाचे आव्हान असणार आहे.