भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चार कसोटी सामन्यांची ‘हाय वोल्टेज’ मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघ विजय रथावर स्वार असल्याने ही मालिका कमालीचे अटीतटीची होऊ शकते. मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने चेतेश्वर पुजाराचा बळी मिळवणे महत्त्वाचे असेल, असे म्हटले आहे.
शुक्रवारपासून सुरू होईल इंग्लंडचा भारत दौरा
नव्या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची मायदेशातील पहिली कसोटी मालिका शुक्रवारपासून इंग्लंड विरुद्ध चेन्नई येथे सुरू होत आहे. बंद दाराआड खेळवली जाणारी ही मालिका कमालीची अटीतटीची होऊ शकते. भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात तर इंग्लंडने श्रीलंकेत कसोटी मालिका विजय साजरा केला आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट जगताचे लक्ष या मालिकेकडे लागलेले दिसून येते. दोन्ही संघात दर्जेदार खेळाडू असल्याने खेळाडू तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
रूटने केले पुजाराचे कौतुक
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले.
त्याने म्हटले आहे की “पुजारा एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याचा बळी मिळवणे आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल. यॉर्कशायरमध्ये असताना आम्ही दोघे एकत्र खेळलो आहोत. त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे होते. तो एक छान अनुभव होता. घरच्या मैदानावर त्याची आकडेवारी शानदार आहे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे आमच्या गोलंदाजांसाठी आव्हान असेल.”
चांगल्या फॉर्ममध्ये आहेत रूट आणि पुजारा
इंग्लंडचा कर्णधार असलेला जो रूट सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने चार डावात १०६.५० च्या सरासरीने ४२६ धावा ठोकल्या होत्या. यात एक द्विशतक तर एका १८६ धावांच्या खेळीचा समावेश होता. इंग्लंड संघ भारतात त्याच्याकडून अशीच अपेक्षा करत आहे. दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराने देखील नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. सिडनी कसोटी अनिर्णित व ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा एकदा एमएस धोनी आणि ‘डेफिनेटली नॉट’ चर्चेत, ‘हे’ आहे कारण
राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडली; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली माहिती
इंग्लंडविरुद्ध दोन विजय अन् टीम इंडिया रचणार २१ व्या शतकातील ‘हा’ मोठा विक्रम