इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडू सहभागी होते. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली आहे. दरम्यान, या लिलावात सर्वात जास्त लक्षवेधक चेहरा होता, तो म्हणजे हर्षल पटेल.
आयपीएल २०२१ च्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावणाऱ्या हर्षलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पुन्हा त्यांच्या ताफ्यात विकत घेतले आहे. तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याच्यासाठी सर्वप्रथम बेंगलोरने बोली लावली. त्यानंतर शर्यतीत चेन्नई सुपर किंग्ज उतरली. तसेच सनरायझर्स हैदराबादनेही त्याला विकत घेण्यासाठी रस दाखवला. मात्र अखेर बेंगलोरने १० कोटी ७५ लाखांसह त्याला संघात कायम केले आहे.
विशेष म्हणजे, आयपीएल २०२१ मध्ये त्याला बेंगलोरने केवळ २० लाखांना विकत घेतले होते. त्यामुळे यंदा तो चक्क कोटींमध्ये जाणे ही हर्षलसाठी मोठी गोष्ट राहिली असेल.
WELCOME BACK to @RCBTweets @HarshalPatel23 #TATAIPLAuction @TataCompanies pic.twitter.com/us5hcfWnjW
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
पर्पल पटेल हर्षलने आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या होत्या. १५ सामने खेळताना त्याने ही कामगिरी केली होती. तो या हंगामात ३० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज राहिला होता. त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने ६३ सामने खेळताना ७८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! आयपीएल लिलावात बोली प्रक्रिया पार पाडणारे ‘ह्युज एडमिड्स’ चालू कार्यक्रमात कोसळले
पडीक्कलवर आरसीबीने बोली लावण्यातही दाखवला नाही रस, अखेर ‘या’ संघाने ७.७५ कोटींसह केले खरेदी
शिमरॉन हेटमायर झाला कोट्यधीश!! आगामी हंगामात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व