आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याची आणि मुंबई इंडियन्स दोन्हींची कामगिरी अतिशय खराब राहिली. त्यानंतर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या हार्दिक क्रिकेट संघापासून दूर असला, तरी पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL) तो कोणत्या संघातून खेळणार, याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, त्याच्या ट्रेड होण्याची बातमी समोर येत आहे. यासाठी अनेक संघांची नावे देखील समोर आली आहेत. त्यापैकी काही नावे बऱ्याच अंशी खरी वाटतात, तर काही केवळ अफवा आहेत. आगामी काळात हार्दिकबाबत एखादा मोठा निर्णय झाला, तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नाही.
रिपोर्ट्सनुसार, केकेआर (KKR) आणि सीएसके (CSK) यांनीही हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी रस दाखवला आहे. तसं पाहिलं तर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्सची (RR) नावही चर्चेत आहे, पण त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. म्हणजेच, या अफवाच आहेत. दरम्यान, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सने (MI) अद्याप हार्दिक पंड्याला ट्रेड करण्यास हिरवा झेंडा दाखवलेला नाही. त्यामुळे कदाचित त्याला ट्रेड केलेच जाणार नाही, अशीही शक्यता आहे.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, काही संघांनी मुंबई इंडियन्सशी हार्दिकबाबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे, सद्यस्थितीत सुरू असलेली ही सर्व चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. म्हणजेच, अजून कोणतीही मोठी अपडेट आलेली नाही, पण पडद्याआड चर्चा सुरू आहेत.
रिपोर्ट्सनुसार, हार्दिकची अदलाबदल अक्षर पटेलसोबत केली जाऊ शकते. म्हणजेच, दिल्ली आणि मुंबई आपापसात खेळाडूंची अदलाबदल करू शकतात. मात्र, हा एक अत्यंत कठीण ट्रेड असेल. दुसरीकडे, केकेआरलाही हार्दिकला आपल्या संघात घ्यायचे आहे, पण बदल्यात त्यांना आपला कोणताही मोठा खेळाडू सोडायचा नाही, त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही. जर केकेआरने कॅमरन ग्रीनला मुंबईला दिले, तर हार्दिक केकेआरमध्ये जाऊ शकतो. पण कॅमरन ग्रीन आयपीएल खेळणार की नाही, याबाबत अद्याप निश्चित सांगता येत नाही.
सीएसकेबद्दल बोलायचे तर, तिकडून अद्याप हार्दिकबाबत कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, प्रथम संघासाठी नवीन प्रशिक्षकाचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील. तत्पूर्वी, जोपर्यंत स्वतः हार्दिक आणि त्याचा संघ ‘मुंबई इंडियन्स’ ग्रीन सिग्नल देत नाहीत, तोपर्यंत काहीही निश्चित होणार नाही. दरम्यान, हार्दिक पंड्या सध्या बंगळुरू येथील सीओई (Centre of Excellence) मध्ये असून आपल्या तंदुरुस्तीवर (Fitness) मेहनत घेत आहे. तो चांगल्या प्रकारे फिट झाला असून भारताच्या आगामी मालिकेत खेळताना दिसू शकतो. आता हार्दिक कधी पूर्ण फिट होऊन मैदानात परततो आणि कशी कामगिरी करतो, याची त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.






