राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.पण चेन्नईचा ऋतुराज गायकवाड याने त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ऋतुराजने दमदार शतक झळकवले. यासोबतच त्याने एका खास विक्रमाला गवसणी देखील घातली आहे.
ऋतुराजने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून कमी वयात शतक झळकावण्याची किमया साधली आहे. त्याने वयाच्या अवघ्या २४ वर्षे २४४ दिवस झाले असतांना आयपीएलमध्ये शतक लगावले आहे. याआधी हा विक्रम मुरली विजय याच्या नावे होता. त्याने वयाच्या २६ वर्षे आणि २ दिवस झाले असताना हा विक्रम आयपीएलमध्ये नोंदवला होता. तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना आहे. त्याने त्याच्या वयाच्या २६ वर्षे आणि १५६ दिवस झाले असताना शतकी खेळी केली होती.
तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय चेन्नईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीने (२५) ४७ धावांची भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर आलेल्या मोईन अली(२१), सुरेश रैना(३) आणि अंबाती रायुडूला(२) फार विशेष कामगिरी करता आली नाही. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाडने एका बाजूने खेळपट्टीवर उभा राहिला.
अखेरच्या काही षटकांमध्ये त्याला रवींद्र जाडेजाने चांगली साथ दिली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी रचली. ऋतुराज शेवटपर्यंत नाबाद राहिला. या दरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने ६० चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. रवींद्र जडेजानेदेखील १५ चेंडूत नाबाद ३२ धावांची खेळी केली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित २० षटकांमध्ये १८९ धावांचा डोंगर उभा केला होता.
पण, नंतर १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांनी तुफानी फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. त्यांना एविन लुईस (२७), संजू सॅमसन (२८) आणि ग्लेन फिलिप्सने (१४*) चांगली साथ दिली. जयस्वालने २१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. तर, दुबे ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
गंभीरने नाव न घेता धोनीला म्हटले तथाकथित फिनिशर? भडकलेल्या चाहत्यांनी व्यक्त केला संताप
खेळ मजामस्तीचा! नाणेफेकीवेळी रिषभ-रोहितने एकमेकांची उडवली खिल्ली ; मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद