इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. चेन्नईने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत या सामन्यात विजय मिळवला. यासोबतच अंतिम फेरीतील त्यांची जागा पक्की झाली. चेन्नईच्या या यशात सलामी जोडी ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. क्वालिफायर सामन्यातही त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत एका खास यादीत आपले नाव समाविष्ट केले.
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर चेन्नईसाठी ऋतुराज व कॉनवे यांनी पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 87 धावा जोडल्या. ऋतुराजने 60 तर कॉनवेने 40 धावा केल्या. ही जोडी मागील हंगामापासून एकत्रित सलामी देत आहे. दोघांनी आतापर्यंत नऊ वेळा चेन्नईसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. याबाबतीत त्यांनी एमएस धोनी व रवींद्र जडेजा यांची बरोबरी केली.
सीएसकेसाठी सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याचा विक्रम माईक हसी व मुरली विजय यांच्या नावे आहे. त्यांनी 13 वेळा ही कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त हसी व सुरेश रैना तसेच रैना व धोनी या जोडीने प्रत्येकी दहा वेळा हा पराक्रम केला आहे.
या हंगामातील ऋतुराज व कॉनवे यांची एकत्रित कामगिरी पाहिल्यास दिसून येते की, त्यांनी 13 सामन्यात 55.40 च्या सरासरीने 775 धावा केल्या. यामध्ये चार वेळा अर्धशतकी तर दोन वेळा शतकी भागीदारी त्यांनी केली. ऋतुराजची वैयक्तिक कामगिरी पाहिल्यास त्याने या हंगामात आतापर्यंत 14 डावांमध्ये 43.38 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने कॉनवेने 14 डावात 52 पेक्षा जास्तच्या सरासरीने 625 धावांचे योगदान दिले आहे. अंतिम सामन्यातही चेन्नईला या दोघांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
(Ruturaj Gaikwad And Devon Conway 9 th 50+ Partnership For CSK In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला रैनासारखे योगदान द्यायचेय”, सीएसकेचा ‘राजकुमार’ ऋतुराजची प्रांजळ कबुली
शेवटी सीएसकेनेच करून दाखवलं! दोन वर्षात पहिल्यांदा गुजरातवर ओढवली ‘ही’ नामुष्की