सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. आयसीसी टी२० विश्वचषक निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत जोरदार पुनरागमन केले आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) कोलकाताच्या ईडन गार्डनवर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. ज्या खेळाडूंना आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांना तिसऱ्या टी२० सामन्यात संधी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड देखील युवा खेळाडूंना संधी देऊन पाहू शकतात. सहावा गोलंदाज म्हणून व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्याला सुरुवातीच्या २ सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.
ऋतुराज गायकवाडची होऊ शकते निवड
आयपीएल २०२१ स्पर्धेत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला ऋतुराज गायकवाड वरच्या फळीमध्ये फलंदाजी करु शकतो. त्यासाठी उपकर्णधार केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. कारण ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला कसोटी मालिका देखील खेळायची आहे. तसेच अक्षर पटेल किंवा आर अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते.
आवेश खानला मिळू शकते पदार्पणाची संधी
तसेच दीपक चाहर किंवा भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. या मालिकेत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघ आणखी एक वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. आवेश खानने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने १६ सामन्यात २४ गडी बाद केले होते.
भारतीय संघाची संभावित प्लेइंग ईलेव्हेन : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsNZ: कधी, कुठे आणि कसा पाहाणार तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
‘रोहित-राहुल आहेत; मात्र, तिसरा सलामीवीर शोधावा लागेल’; भारतीय दिग्गजाने केले सावध