भारत ‘अ’ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं रणजी ट्रॉफीतील एका वादग्रस्त निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात सध्या सेनादल आणि महाराष्ट्राच्या संघात रणजी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनादलानं आघाडी घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या डावात कर्णधार अंकित बावणेला बाद करण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात ऋतुराज गायकवाडनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून संघाच्या निर्णयावर प्रश्न विचारले आहेत. ऋतुराज गायकवाडनं इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं की, “लाइव्ह मॅचमध्ये याला आउट कसं दिलं जाऊ शकतं? यासाठी अपिल करणं देखील लज्जास्पद आहे.”
झालं असं की, फलंदाजी दरम्यान अंकित बावणेनं दुसऱ्या स्लिपकडे चेंडू हलकाच खेळला होता. परंतु चेंडू बॅटच्या कडाला लागून क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. मात्र रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून आलं की, क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचण्यापूर्वीच चेंडूनं जमिनीला स्पर्श केला होता. यावर ऋतुराजनं नाराजी व्यक्त करत याला बाद कसं दिलं, असा प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्र विरुद्ध सेनादल सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, सलामीवीर सूरज वशिष्ठ (79 धावा, 191 चेंडू, नऊ चौकार, एक षटकार) आणि शुभम रोहिल्ला (67 धावा, 132 चेंडू, नऊ चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावा जोडून सेनादलाला चांगली सुरुवात करून दिली. रवी चौहाननं 130 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 59 धावांची खेळी करत पाहुण्या संघाची स्थिती मजबूत केली.
सेनादलानं पहिल्या डावात 110.3 षटकात 293 धावा केल्या. प्रत्युत्तरात, महाराष्ट्रानं 58.5 षटकांत 185 धावा केल्या. दुसऱ्या डावात सेनादलानं एकही विकेट न गमावता 15 धावा केल्या असून संघाकडे सध्या 123 धावांची आघाडी आहे.
हेही वाचा –
मुंबई इंडियन्सनं हरमनप्रीतसह 14 खेळाडूंना रिटेन केलं, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या
मेगा लिलावात आरसीबीनं या 4 खेळाडूंवर हमखास बोली लावावी, एबी डिव्हिलियर्सचा मोलाचा सल्ला
“लिलावात 25-26 कोटी!!”, हा असेल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; आकाश चोप्रांची भविष्यवाणी