येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौर्यावर मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. मात्र त्याच दरम्यान भारताचा मुख्य संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौर्यासाठीच्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली.
यातच पुण्याचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडची देखील निवड झाली. ऋतुराज गायकवाड गेली काही वर्षे सातत्याने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतो आहे. तसेच आयपीएल मध्ये देखील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळतांना त्याने प्रभावित केले आहे. याच कामगिरीचे फळ म्हणून भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. त्याने नुकतेच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीबाबत मोठे वक्तव्य केले.
“धोनी जे काही सांगतो, ते कायम फॉलो करायला हवे”
आयपीएल दरम्यान धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऋतुराजने धोनीबाबत कौतुकोद्गार काढले. तो म्हणाला, “धोनीबद्दल बोलायचे झाले तर ते जे काही सांगतात ते कायम फॉलो करायला हवे. मी ऐकले होते सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये त्यांनी माझ्याबद्दल बातचीत केली होती. मी खरंतर त्यांच्याशी फार संवाद साधत नाही. आणि त्यांना पण माहिती आहे की मी एक शांत खेळाडू आहे. पण जेव्हा जेव्हा त्यांना जाणवत असे की मी दबावात आहे, तेव्हा तेव्हा ते लगेच येऊन माझ्याशी बोलत असत.”
दरम्यान, येत्या श्रीलंका दौर्यावर निवड झाल्याने ऋतुराज अतिशय आनंदी होता. तो म्हणाला, “मी खरंच खूप खुश आहे. ज्या क्षणी मला निवड झाल्याची बातमी कळाली, त्या क्षणी माझी संपूर्ण कारकीर्द माझ्या डोळ्यांसमोरून गेली. यावेळी निश्चितच तुम्हाला त्यांची आठवण येते, ज्यांनी तुम्हाला या प्रवासात साथ दिली. यात माझे आई वडिल आहेत, माझे प्रशिक्षक आहेत, मित्र आहेत. या सगळ्यांसाठी हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या:
एन्गिडी आणि नॉर्कीएचा कहर! वेस्ट इंडीजचा उडविला ९७ धावांत खुर्दा, दक्षिण आफ्रिकेला मिळाली आघाडी
‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क
अरेरे! फ्लिंटॉफच्या ‘त्या’ वक्तव्याची शिक्षा मिळाली होती ब्रॉडला; युवराजने ठोकले होते सलग ६ षटकार