दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघादरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंका संघ 5 धावांनी आघाडीवर पोहोचला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या श्रीलंकन संघाचा पहिला डाव मात्र 157 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन संघ मोठी आघाडी घेणार असे वाटत असतानाच आफ्रिकेने आपले शेवटचे 8 फलंदाज मात्र 84 धावांवर गमावल्याने त्यांचा पूर्ण डाव 302 धावांवरच आटोपला . दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर डीन एलगरने सर्वाधिक 127 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून विश्वा फर्नांडोने 101 धावा देत 5 बळी मिळविले.
श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात देखील खराब झाली व सलामीवीर कुसल परेरा केवळ 1 धाव करून तंबूत परतला. एका बाजूने श्रीलंका संघ नियमीत अंतरावर विकेट गमावत असून देखील, दुसऱ्या बाजूने करुणारत्ने कर्णधाराला साजेशी खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले . दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेने 4 गडी गमावत 150 धावांपर्यंत मजल मारली होती. करुणारत्ने 91 तर यष्टीरक्षक निरोशन डीकविला 18 धावांवर नाबाद होते.
श्रीलंकेकडे माफक अशी 5 धावांची आघाडी आली असून, तिसऱ्या दिवशी श्रीलंकन चाहत्यांना अपेक्षा असेल की करुणारत्ने मोठी शतकी खेळी करत संघाची आघाडी आणखी वाढवेल.