दक्षिण आफ्रिकेने महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करून चांगली सुरुवात केली. ड्युनेडिन येथे शनिवारी (५ मार्च) झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशसमोर २०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, बांगलादेश संघाचा डाव ३ चेंडू बाकी असताना १७५ धावांवर आटोपला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा ३२ धावांनी पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात पूर्ण २ गुण झाले आहेत.
तत्पूर्वी, बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मारिजाने कॅपच्या ४२ आणि सलामीवीर लॉरा वॉलवॉर्टच्या ४१ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ४९.५ षटकांत २०७ धावा केल्या. चोले ट्रायॉनने ३९ धावांचे योगदान दिले. तर, कर्णधार सुन लुस २५ धावा करून बाद झाली. बांगलादेशकडून फारिया तृषानाने ३ तर जहानारा आलम आणि रितू मोनीने प्रत्येकी २ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाला शर्मीन अख्तरच्या ३४ आणि सुलतानाच्या २९ धावा असूनही केवळ 175 धावा करता आल्या. बांगलादेशी संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. त्यांच्या वतीने सुलताना आणि अख्तर यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती. या दोघांनी ६९ धावांची भागीदारी केली. मात्र, नंतर संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला.
बांगलादेशला या धावसंख्येपर्यंत नेण्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी या डावात तब्बल २२ अतिरिक्त धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने ४ तर मसाबा क्लासने २ बळी घेतले. खाकाला तिच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दिवसातील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत स्पर्धेची शानदार सुरुवात केली.
महत्वाच्या बातम्या-