महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएलचा तिसरा हंगाम 4 जूनपासून सुरु होत आहे. पहिल्या दोन हंगामाच्या लोकप्रियतेनंतर आता तिसऱ्या हंगामात कोण विजेतेपदाची ट्रॉफी उंचावतंय हे पहाणे मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे. यंदाच्या या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील. या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील.
परंतू स्पर्धेत यावर्षी गोलंदाजांचा बोलबाला असेल, असे बोलले जात आहे. पहिल्या हंगामापासूनच अनेक गोलंदाजांनी या लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या हंगामात पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 7 सामन्यात 12.57च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या. सचिनच पर्पल कॅपचा विजेता ठरला होता.
सचिननंतर त्याचाच संघसहकारी असलेल्या पियुष साळवीने 7 सामन्यात 15.25 सरासरीने 12 विकेट्स घेतल्या होत्या. महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज आणि रत्नागिरी जेट्सचा स्टार प्रदिप दाढेने 6 सामन्यात 11 विकेट घेत रत्नागिरीला पहिले वाहिले विजेतेपद मिळवून देताना हातरभार लावला होता. त्याने 12.82च्या सरासरीने या विकेट्स घेतल्या होत्या.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या मनोज यादवने 8 सामन्यात 11 विकेट घेत कोल्हापूरला फायनलमध्ये पोहचविण्यात मोलाचा वाटा उचलला होता. टेनिस क्रिकेटचा किंग अशी ओळख असलेल्या विजय पावलेने रत्नागिरी जेट्सकडून खेळताना 6 सामन्यात 10 विकेट्स घेत विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला होता.
आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मोफत सामने पहाण्याची संधी
MPLचे सर्व सामने तसेच WMPLचेही सर्व सामने यावेळी प्रेक्षकांना स्टेडियमवर जाऊन मोफत पाहता येणार आहे. याची माहिती यापुर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही रोहित दादा पवार यांनी केले आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.
आता मोबाईलवर पहा एमपीएलचे सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.






