ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारतीय संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले. त्यानंतर अनेक जण ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक करताना दिसत आहेत. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने ऑस्ट्रेलिया संघाचे कौतुक करताना, भारतीय संघाच्या पराभवाचे विश्लेषण देखील केले.
सचिनने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक ट्वीट करताना लिहिले, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. स्मिथ व हेड यांनी पहिल्या दिवशीच खेळ त्यांच्या बाजूने झुकवण्यासाठी एक भक्कम पाया रचला. खेळात टिकून राहण्यासाठी भारताला पहिल्या डावात चांगली फलंदाजी करणे गरजेचे होते. मात्र, ते शक्य झाले नाही. भारतीय संघासाठी काही चांगले क्षण होते, परंतु प्लेइंग इलेव्हनमधून रविचंद्रन अश्विनला वगळणे मला समजले नाही, जो सध्या जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.”
“मी सामन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, कुशल फिरकीपटू फिरकी गोलंदाजीला मदत असणाऱ्या खेळपट्टीवरच अवलंबून नसतात. ते परिस्थितीचा योग्य वापर करून घेतात. हे विसरून चालणार नाही की, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 8 फलंदाजांपैकी 5 डावखुरे होते,” असेही पुढे बोलताना सचिन म्हणाला.
यामध्ये तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला संघातून बाहेर करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
या सामन्याचा विचार केल्यास भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेड व स्टीव्ह स्मिथ यांनी शतके झळकावली. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात 467 धावा केल्यानंतर भारतीय संघ 296 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी करत आपली आघाडी वाढवली. विजयासाठी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाच्या खेळानंतर भारताने 3 बाद 164 धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावांची गरज होती. मात्र, भारतीय फलंदाजी एका सत्रात ढेपाळल्याने संघाला 209 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.
(Sachin Tendulkar Explain World Test Championship Final Backs Ashwin)
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही पहिल्याच दिवशी हारलो…’, BCCI अध्यक्षांनी सांगितले भारताच्या पराभवामागील सर्वात मोठे कारण
‘आयसीसी ट्रॉफी जिंकणं सोपं नाही’, रवी शास्त्रींकडून तीन विजेतेपदांसाठी धोनीचे कौतुक