मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 200 वी कसोटी कोठे होईल, याविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत. जोहान्सबर्ग, केपटाऊन, डर्बन, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता या शहरांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. मात्र, यामध्ये मुंबईचा दावा अधिक प्रबळ असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीज आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
घरच्या मैदानावर सचिनला 200 वी कसोटी खेळण्याची संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआय सचिनच्या या कामगिरीला अविस्मरणीय करण्यास इच्छुक आहे. यासाठीच वेस्ट इंडीजच्या भारत दौर्याचे आयोजन निश्चित करण्यात आले. हा दौरा यापूर्वीही निश्चित होऊ शकला असता. मात्र, क्रिकेट मंडळातील हारुण लोर्गट यांच्या निवडीमुळे दक्षिण आफ्रिकेसोबत सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मतभेद निर्माण झाले आहेत. वेस्ट इंडीज दौरा मध्येच आयोजित करण्याचे हेही प्रमुख कारण आहे. लोर्गटच्यासोबत बीसीसीआयच्या अनेक कटू आठवणी आहेत. या आठवणी बीसीसीआय विसरू इच्छित नाही. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना लोर्गट यांनी डीआरएस पद्धत लागू केली होती. याला बीसीसीआयची संमती नव्हती. यामध्ये अनेक उणिवा असल्याचे कारण समोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी डीआरएसला विरोध केला होता. लोर्गट यांनी बीसीसीआयची माफी मागावी, असे अंतरिम अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी स्पष्ट केले. दालमिया आणि लोर्गट यांच्यातही काही खास संबंध नाहीत. 2011 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान लोर्गट यांनी भारत व इंग्लंड यांच्यातील ईडन गार्डनवरील सामना रद्द केला होता. हे मैदान सामन्याच्या आयोजनासाठी परिपूर्ण नसल्याचा ठपका ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला होता.
लोर्गट यांनी बीसीसीआयविरुद्ध आपली भूमिका निर्माण केली आहे. क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी स्वत: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा निश्चित केला. याबाबतीत बीसीसीआयशी सल्लामसलत केली नाही. या प्रकरणी भारताच्या क्रिकेट मंडळाने विरोध केल्यानंतर यामध्ये वितुष्ट निर्माण झाले. मात्र, हे प्रकरण अधिकच ताणले जात असल्याचे लक्षात आल्यावर लोर्गट यांनी माफी मागण्याची भूमिका घेतली. पुढच्या आठवड्यात दुबईत होणार्या बैठकीत लोर्गट आणि बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांची भेट होणार आहे.
सचिनचा 200 वा कसोटी सामना भारतात किंवा विदेशात झाल्यास काय फरक पडणार आहे? हा काही मोठा चर्चेचा विषय केला जाऊ नये. जगात सचिनची सर्वत्र लोकप्रियता आहे. माझ्या मते, विदेशी खेळपट्टीवर जास्त कसोटी खेळल्याने आपल्याला युवा, प्रतिभावंत आणि महत्त्वाकांक्षी खेळाडूंमधील पैलू पारखण्याची संधी मिळेल.
लेखक- सुनिल मल्लेश कोडगी, सोलापूर.
(मुक्त पत्रकार, [email protected] )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)