न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर सर्व बाजूंनी टीका होत आहे (Odi Series IND vs NZ). विशेषतः शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गिलने या मालिकेत चांगले नेतृत्व केले नाही, असे अनेकांचे मत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय खेळाडू मनोज तिवारीने (Manoj Tiwari on Shubman gill’s captaincy) मत व्यक्त केले आहे की, गिलला कर्णधार पदावरून हटवून कोणतीही वाट न पाहता पुन्हा रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडेचा कर्णधार बनवले पाहिजे.
‘इनसाइड स्पोर्ट्स’शी बोलताना मनोज तिवारी म्हणाला, रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्याची गरजच काय होती? मला पूर्ण खात्री आहे की, जर आजही वनडेमध्ये रोहित नेतृत्व करत असता, तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता. जेव्हा संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तेव्हा मला वाटले होते की संघ योग्य दिशेने पुढे जात आहे.
जेव्हा मनोजला विचारण्यात आले की, शुबमनला हटवून रोहितकडे तातडीने कर्णधार पद सोपवावे का? तेव्हा त्याने उत्तर दिले, हो, नक्कीच. मी हेच सुचवत आहे कारण अजूनही सुधारणा करण्यासाठी वेळ आहे. ही विश्वचषकाची बाब आहे. आपण एखाद्या साध्या आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी किंवा छोट्या स्पर्धेसाठी जात नाही आहोत.
तिवारीच्या मते, 2027 चा वनडे विश्वचषक जिंकण्याची भारताची शक्यता शुबमन गिलपेक्षा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जास्त आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने मायदेशात भारताचा 2-1 ने पराभव केला होता. शुबमन गिल आतापर्यंत भारताला एकही वनडे मालिका जिंकून देऊ शकलेला नाही, त्यामुळेच त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.






