गोल्ड कोस्ट | राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताचा बडमिंटनमधील धडाका सुरूच आहे. किदांबी श्रीकांत पुरुष एकेरीत, सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू महिला एकेरीत तर आर स्वस्तिक आणि चिराग शेट्टी पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत.
यामूळे भारताला उद्या बॅडमिंटनमध्ये ४ पदके मिळणार आहे. फक्त उद्या या पदकांचे रंग कोणते असणार आहेत हे निश्चित होणार आहे.
सायना नेहवालने उपांत्यफेरीत स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरला २१-१४, १८-२१, २१-१७ असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सायनाने चांगला खेळ करत आघाडी घेतली. मात्र दुस-या सेटमध्ये क्रिस्टी गिलमोरने जोरदार पुनरागमन करत सेट २१-१८असा जिंकला. तिसरा सेट सायनाने २१-१७ जिंकत सायनाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीव्ही सिंधूने कॅनडाच्या मिशेले लीला २१-१८, २१-८ असे पराभूत केले. हा सामना केवळ ३६ मिनीटे चालला.
भारताच्या या दोन्ही खेळाडूंना आॅलिंपिकमध्ये पदक मिळालेले आहे.
कधी आहे सायना-सिंधूचा हा सामना-
राष्ट्रकूल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अर्थात उद्या १५ एप्रिल रोजी हा सामना होणार आहे. राष्ट्रकूल स्पर्धेच्या संकेतस्थलानूसार हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५ वाजून ३०मिनीटांला सुरू होईल. तर आॅस्ट्रेलियन स्थानिक वेळेनूसार हा सामना सकाळी ९ वाजून ३० मिनीटांनी होईल.
कोणती पदके या सामन्यातून भारताला मिळणार-
भारताला या सामन्यातून एक सुवर्ण तर एक रौप्यपदक मिळणार आहे. हे कोणत्या खेळाडूला मिळणार हे उदयाचा सामना ठरवणार आहे.
काय आहे या खेळाडूंची जागतिक क्रमवारी-
सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या तर सायना बाराव्या स्थानावर आहे.
काय आहे या दोन खेळाडूंची राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतील कामगिरी-
सिंधू महिला एकेरीत ग्लासगो राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती ठरली होती तर सायनाने २०१०ला दिल्ली राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.