पुणे : सेंट व्हिन्सेंट स्कूलने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस मैदानावर ही स्पर्धा झाली.
स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कूलने महंमदवाडीच्या दिल्ली पब्लिक स्कूलवर ४-०ने मात केली आणि विजेतेपद पटकावले. यात लढतीच्या १२व्या मिनिटाला हितेश यादवने वियान मुरगोडच्या पासवर गोल करून सेंट व्हिन्सेंटला आघाडी मिळवून दिली. यानंतर १९व्या मिनिटाला वियान मुरगोडने भार्गव सावंतच्या पासवर गोल करून सेंट व्हिन्सेंटची आघाडी २-० ने वाढवली. लढतीतील २३व्या मिनिटाला फ्रँकलिन नाझरथने दिनेश चंदर्गीच्या पासवर तिसरा, तर ३१व्या मिनिटाला भार्गव सावंतने वियान मुरगोडच्या पासवर चौथा गोल केला. दिल्ली स्कूलला शेवटपर्यंत सेंट व्हिन्सेंटची बचाव फळी भेदता आली नाही.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कूलने कॅम्पमधील द बिशप्स स्कूलवर ४-०ने मात केली. यात सेंट व्हिन्सेंटकडून फजल शेखने (२, १४ मि.) दोन गोल केले, तर भार्गव सावंत (७ मि.) आणि हितेश यादव (२१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. जसकर भट्टीच्या (८ मि.) एकमेव गोलच्या जोरावर दिल्ली पब्लिक स्कूलने दुसºया उपांत्य लढतीत पाषाणच्या लॉयला हायस्कूलवर १-०ने मात केली.
मुलींमध्ये सेंट मेरीजला विजेतेपद
या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट मेरीज स्कूलने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत सेंट मेरीज स्कूलने कॅलम हायस्कूलवर १-०ने मात केली. यात लढतीच्या २४व्या मिनिटाला कॅलम हायस्कूलच्या लियाना फर्नांडिसने हँड केल्यामुळे सेंट मेरीज स्कूलला पेनल्टी मिळाली. यावर सुरभी उपाध्यायने गोल करून सेंट मेरीजला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सेंट मेरीज स्कूलने विजेतेपद मिळवले. यानंतर पियुषा नरकेच्या (२ मि.) शानदार गोलच्या जोरावर एंजल मिकी अँड मिनी स्कूलने कल्याणीनगरच्या बिशप्स स्कूलवर १-०ने मात करून तिसरा क्रमांक मिळवला.