क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि रोमांचक टी२० लीग म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). आयपीएलमधून खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी आणि चिक्कार पैसा यामुळे जगभरातील अनेक युवा खेळाडूंसह मोठ-मोठे दिग्गजदेखील आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात.
नेहमी आयपीएल लिलावात काही नवीन खेळाडूंना संघ विकत घेतात. तर, दूसऱ्या कोणत्या संघातील खेळाडूला जास्त किंमत देऊन आपल्या संघात सहभागी करुन घेतात. तसेच, बरेच खेळाडू असेही असतात, ज्यांना एखाद्या संघाने गतवर्षी किंवा काही वर्षांपुर्वी विकत घेतलेले असते आणि ते पुढील वर्षीही त्याच संघाचा भाग असतात. अशा खेळाडूंनाही त्यांचा आयपीएल पगार मिळतो. खेळाडूंप्रमाणे कर्णधारांचेही असेच असते.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्व संघांच्या कर्णधारांविषयी बोलायचं झालं, तर बऱ्याच संघांनी नव्या खेळाडूंवर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तर, गतवर्षी किंवा गेल्या काही वर्षांपासून संघाचे नेतृत्त्व केलेले खेळाडूच यावर्षीही कर्णधाराची जबाबदारी सांभाळत आहेत. या लेखात, आयपीएलच्या तेराव्या हंगामातील सर्व ८ संघांच्या कर्णधारांना फ्रंचायझी किती पैसे देते, याची माहिती देण्यात आली आहे. Salary Of Each Captain Of IPL 2020 Teams
तर बघूयात…
विराट कोहली- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीच्या खांद्यावर आहे. मात्र, या कर्णधाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आयपीएलमध्ये हवे तसे यश वाट्याला आले नाही. असे असले तरी, विराटच्या प्रदर्शनाला पाहता फ्रंचायझीने अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. तो आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आरसीबीचा कर्णधार आहे.
हा दमदार खेळाडू आयपीएल २०२०चा सर्वात महागडा कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. त्याला आरसीबी संघ यावर्षी तब्बल १७ कोटी इतका पगार देत आहे.
रोहित शर्मा- मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स, आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ. या संघाच्या घवघवीत यशाचे श्रेय जाते ते, संघाचा कर्णधार रोहित शर्माला. मुंबईने २०१३ साली पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी पटकावली होती. त्या वर्षी रोहित संघाचे नेतृत्त्वपद सांभाळत होता. एवढ्यावरच तो थांबला नाही. पुढे त्याने २०१५, २०१७ आणि २०१९ या हंगामातही संघाला विजेता बनवले. त्यामुळे मुंबईच्या यशाचे श्रेय रोहितला देणे वावगे ठरणार नाही.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातही रोहित मुंबईचे नेतृत्त्वपद सांभाळत आहे. त्याच्यासाठी संघ तब्बल १५ कोटी रुपये खर्च करत आहे.
एमएस धोनी- चेन्नई सुपर किंग्स
भारतीय क्रिकेट संघाला २ वेळा विश्वविजेता बनवणारा एमएस धोनी हा आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाला ३ वेळा ट्रॉफी जिंकवून देत, आयपीएलचा दूसरा सर्वात यशस्वी संघ बनवले आहे. त्यामुळे फ्रंचायझी त्याच्या क्षमतेवर खूप विश्वास ठेवते.
म्हणून धोनी ३९ वर्षांचा झाला असला, तरी संघाने यंदाही त्यालाच कर्णधार बनवले आहे. त्याच्यासाठी संघाने तब्बल १५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
डेव्हिड वॉर्नर- सनराइजर्स हैद्राबाद
डेव्हिड वॉर्नर याला आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट परदेशी खेळाडूंमध्ये गणले जाते. तो आयपीएलमध्ये एकदाही शून्यावर बाद न होता ३ वेळा ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) जिंकणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच त्याने २०१६ साली सनराइजर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्त्व केले होते. एवढेच नव्हे तर, त्याने संघाला त्याचवर्षी पहिल्यांदा आयपीएल विजेतादेखील बनवले होते.
त्यामुळे यंदा हैद्राबाद संघाने पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवत, संघाची कमान त्याच्या हाती दिली आहे. यासाठी संघ त्याला तब्बल १२.५० कोटी रुपये इतका पगार देत आहे.
स्टिव्ह स्मिथ- राजस्थान रॉयल्स
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज स्टिव्ह स्मिथ याची क्रिकेटजगतातील दिग्गज खेळाडूंमध्ये गणना केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे स्मिथने आयपीएलमध्ये त्याची छाप पाडली आहे. गतवर्षी स्मिथ आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्यावेळी अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.
त्यामुळे फ्रंचायझीने यावर्षी संघाचे नेतृत्त्व स्मिथवर सोपवले आहे. कदाचित स्मिथच्या नेतृत्त्वाखालील आयपीएल २०२०मध्ये तरी संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी पटकावेल अशी फ्रंचायझीला आशा आहे. त्यासाठी राजस्थान संघ स्मिथवर तब्बल १२.५० कोटी रुपये खर्च करत आहे.
केएल राहुल- किंग्स इलेव्हन पंजाब
प्रिती झिंटाचा किंग्स इलेव्हन पंजाब हा आयपीएल इतिहासातील त्या संघांपैकी एक आहे, ज्यांनी आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएल विजेता बनण्याचा मान आपल्याला मिळावा, अशी पंजाबची इच्छा आहे. त्यासाठी संघ अनेक प्रयत्न करताना दिसत आहे.
पंजाबने २०१८ साली भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला तब्बल ११ कोटी रुपयांना विकत घेतले होते. तसेच त्याने गतवर्षी संघासाठी दमदार भूमिकाही निभावली होती. त्यामुळे आयपीएल २०२०मध्ये संघाचे नेतृत्त्वपद राहुलला देण्यात आले आहे.
श्रेयस अय्यर- दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स संघ हादेखील आयपीएलच्या त्या संघांपैकी एक आहे, ज्यांनी आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. दिल्लीने २०१८ साली अर्ध्या हंगामातून श्रेयस अय्यरला कर्णधारपद दिले होते. त्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. अय्यरने त्याच्या नेतृत्त्वाखाली गतवर्षी संघाला प्लेऑफमध्येही पोहोचवले होते.
त्यामुळे यंदाही संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहेत. संघ त्याच्यासाठी दर हंगामात ७ कोटी रुपये खर्च करतो.
दिनेश कार्तिक- कोलकाता नाईट रायडर्स
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर याने आपल्या नेतृत्त्वाखाली कोलताना नाईट रायडर्स संघाला २ वेळा आयपीएल विजेता बनवले होते. त्याच्यानंतर २०१८ साली दिनेश कार्तिकला केकेआरचा कर्णधार बनवण्यात आले. संघ त्याला ७.४ कोटी रुपये पगार देतो.
गेल्या २ वर्षात कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली केकेआरचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. परंतु, संघाला यावर्षी त्याच्याकडून अजून जास्त अपेक्षा आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-‘कल्याण एक्सप्रेस’ युएईत धावणार सुसाट
-आयपीएल २०२०मध्ये ‘हे’ २ भारतीय धुरंदर मोडू शकतात सुरेश रैनाचा दमदार विक्रम
-ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
महत्त्वाच्या बातम्या-
-सीएसकेला धोनीऐवजी हवा होता हा कर्णधार, फक्त एका गोष्टीमुळे बदलले संघमालकाचे मन
-आधीच संकटात असलेली चेन्नई स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड तर मारुन घेत नाही ना???