बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. या सामन्यात इंग्लंडचा २१ वर्षीय सॅम करन हा अष्टपैलू खेळाडू भारताची डोकेदुखी ठरला.
विषेश म्हणजे तो झिम्बाब्वेचे माजी अष्टपैलू खेळाडू केविन करन यांचा मुलगा आहे. केविन करन हे १९८३ आणि १९८७ च्या विश्वचषकात खेळले होते.
१९८३ च्या विश्वचषकात १८ जूनला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात झालेला सामना सर्वांनाच कर्णधार कपिल देव यांनी केलेल्या नाबाद १७५ धावांमुळे कायमचा लक्षात राहिला. पण याच सामन्यात केविन करन यांनी केलेली अष्टपैलू कामगिरी भारतासाठी त्रासदायक ठरली होती.
त्यांनी या सामन्यात ३ विकेट्स घेताना के श्रीकांत, संदिप पाटील आणि मदन लाल या फलंदाजांना बाद केले होते.
त्यानंतर भारताने दिलेल्या २६७ धावांचा पाठलाग करताना ७३ धावांची अष्टपैलू खेळी केली होती. मात्र त्यांना संघातील बाकी खेळाडूंची साथ न मिळाल्याने झिम्बाब्वेला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
त्यांच्या प्रमाणेच सॅम करनचीही अष्टपैलू शैली असून त्यानेही याची प्रचीती दिली आहे. सॅमने ४ आॅगस्टला भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळताना पहिल्या डावात ४ विकेट्स तर दुसऱ्या डावात १ विकेट अशा मिळून ५ विकेट्स घेतल्या.
तसेच फलंदाजी करताना पहिल्या डावात २४ आणि दुसऱ्या डावात ६३ धावा करत अर्धशतक केले होते. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे. तसेच तो वयाची २१ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच सामनावीर ठरलेला सॅम इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला.
विषेश योगायोग म्हणजे १८ जून १९८३ ला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात झालेल्या सामन्यात भारताने ३१ धावांनी विजय मिळवला होता, तर १ ते ४ आॅगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला ३१ धावांनीच पराभव स्विकारावा लागला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
–इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?
–यामुळेच इशांत शर्माने पहिल्या सामन्यात मिळवल्या ८ विकेट