इंग्लंड आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन पाठीच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल २०२१ हंगामातून आणि आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. याबद्दल मंगळवारी (५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.
संयुक्त अरब अमिराती येथे सध्या आयपीेल २०२१ हंगामाचा थरार रंगला आहे. हा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला असल्याने रोमांच अधिक वाढला आहे. तसेच या स्पर्धेनंतर युएई आणि ओमान येथे टी२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण या मोठ्या स्पर्धांमधून सॅम करनची माघार हा इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासाठी आणि चेन्नईसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार चेन्नईने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामना खेळल्यानंतर सॅम करनने त्याच्या पाठीत वेदना असल्याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आले. त्यात त्याला दुखापत झाल्याचे कळाले आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसात सॅम करन इंग्लंडला रवाना होईल. तिथे त्याच्या दुखापतीवर इंग्लंड संघाचे वैद्यकीय पथक पुढील उपचार करेल.
सॅम करन टी२० विश्वचषकातून बाहेर झाल्याने त्याचा मोठा भाऊ टॉम करनला इंग्लंडने टी२० विश्वचषकासाठी त्यांच्या राष्ट्रीय संघास स्थान दिले असून रिस टोप्ले राखीव खेळाडू असेल. २३ वर्षीय सॅम करनने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत २४ कसोटी, ११ वनडे आणि १६ टी२० सामने खेळले आहेत.
तसेच चेन्नईसाठी सॅम करनने २०२१ हंगामात ९ सामने खेळले असून ९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने गेल्यावर्षी चेन्नईसाठी अष्टपैलू कामगिरी करताना १४ सामन्यांत १८६ धावा केल्या होत्या आणि १३ विकेट्स घेतल्या होत्या.
स्पर्धेतून बाहेर पडणे दुर्दैवी
उर्वरित आयपीएल २०२१ हंगामातून आणि टी२० विश्वचषकातून बाहेर पडणे दुर्दैवी असल्याचे सॅम करनने म्हटले आहे. चेन्नईच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सॅम करन म्हणाला, ‘दुर्दैवाने मला एक धक्कादायक बातमी मिळाली आहे, की मी आयपीएलच्या या हंगामातून आणि टी२० विश्वचषकातून बाहेर पडणार आहे. अत्यंत हतबल झालो.’
‘या हंगामात चेन्नईसोबतचा माझा वेळ चांगला गेला. खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. हे खरोखर अजून संपलेले नाही, पण मी संघ चांगल्या स्थितीत असताना मी संघाला सोडून जात आहे. खेळाडू खरोखर चांगले क्रिकेट खेळत आहेत. पुढच्या काही दिवसांत मी जिथे असेल, तिथू त्यांना पाठिंबा देईल. हे संपेल तेव्हा मला विश्वास आहे, मी संघाला पाठिंबा देत राहिल आणि संघ नक्कीच विजेतेपद जिंकेल.’
सॅम करन पुढे म्हणाला, ‘चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व चाहत्यांचे फक्त आभार मानू इच्छितो, मी खेळलेल्या गेल्या दोन हंगामात तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला आंनद झाला. तुमच्या सर्वांसमोर मी लवकरच धावा करण्यासाठी, गोलंदाजी करण्यासाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी परत येईल. मी पुन्हा मजबूत होईन, तोपर्यंत सुरक्षित रहा. शुभेच्छा मित्रांनो.’
आयपीएल २०२१ हंगाम १५ ऑक्टोबरला संपणार असून १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्टार्क घेणार होता क्रिकेटमधून ब्रेक; भावनिक होते कारण; पत्नी एलिसा हिलीने केला खुलासा
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास