इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नुकताच त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याच्या या निर्णयामुळे अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्याचवेळी इंग्लंडचा दुसरा युवा अष्टपैलू सॅम करनने एक महत्वपूर्ण विधान केले.
२०१९ विश्वचषकात इंग्लंडला विजेता बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणे शारीरिकदृष्ट्या अशक्य असल्याचे त्याने म्हटले होते. त्याच्या या निर्णयानंतर अतिक्रिकेटबाबत चांगली चर्चा होतेय. अनेक खेळाडू असाच मार्ग अवलंबतील, असे काही समीक्षक म्हणताना दिसत आहेत.
त्याच्या या निर्णयानंतर इंग्लंडचा दुसरा युवा अष्टपैलू सॅम करनने प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्सनंतर रिक्त झालेली जागा भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू असे त्याने म्हटले. करन म्हणाला,
“एक क्रिकेटपटू म्हणून मी नेहमीच बेन स्टोक्सला आदर्श मानले आहे. मी जवळजवळ त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या निवृत्तीमुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे आणि खेळाडूंना त्याची खूप उणीव भासणार आहे. मात्र, मी फार पुढे विचार करू इच्छित नाही. जेव्हा मी गोलंदाजी आणि फलंदाजी करतो तेव्हा मला फक्त योगदान द्यायचे असते. मला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा मी संघासाठी पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच्यासारखेच योगदान इंग्लंड क्रिकेटसाठी द्यायला आवडेल.”
सॅम करन याच्याकडे बेन स्टोक्सचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. करन डाव्या हाताने मध्यम गोलंदाजी, तसेच डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करू शकतो. त्याने इंग्लंडसाठी तीनही प्रकारचे क्रिकेट खेळतो. सध्या २४ वर्षाच्या असलेल्या करनने इंग्लंडसाठी आजपर्यंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५६ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा
विराट नाही तर सूर्यकुमार ठरतोयं ‘या’ खेळाडूसाठी धोकादायक, भारताच्या दिग्गजाचे आश्चर्यकारक विधान
WIvIND: वेस्ट इंडिजचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; आवेश खानचे वनडे पदार्पण