भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सॅम कॉन्स्टास यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर बाचाबाची झाली. कॉन्स्टास जेव्हा फलंदाजीला आला, त्यावेळी कोहली आणि त्याचा एकमेकांना धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. यावर आता कॉन्स्टासकडून प्रतिकिया समोर आली आहे.
वास्तविक, ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावात दहाव्या षटकानंतर घडली. ओव्हर संपल्यानंतर जेव्हा खेळाडू एकमेकांना पास करत होते तेव्हा कोहलीचा खांदा कॉन्स्टासला लागला. यानंतर दोघेही एकमेकांकडे वळाले आणि काहीतरी बोलले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा तेथे आला आणि त्यानं दोघांना वेगळं केलं. यानंतर मैदानावरील अंपायरनं देखील दोघांशी चर्चा केली.
या घटनेची दखल आयसीसीनं देखील घेतली आहे. कॉन्स्टासला धक्का मारल्याप्रकरणी आयसीसीनं कोहलीला त्याच्या मॅच फीचा 20 टक्के दंड ठोठावला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कॉन्स्टासनं या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, कोहलीनं जाणूनबुजून त्याला धक्का दिला नाही.
कॉन्स्टास म्हणाला, “विराट कोहलीची माझ्याशी चुकून टक्कर झाली. हा खेळ आहे आणि असं तणावामुळे घडतं. मला वाटतं की आम्ही दोघंही भावनांच्या भरात वाहून गेलो होतो. मला अजिबात समजलं नाही. मी माझे हॅन्डग्लोव्ह्ज घालत होतो तेव्हा अचानक त्याचा खांदा माझ्यावर आदळला. क्रिकेटमध्ये हे सर्व घडत राहतं.”
या घटनेच्या वेळी कॉन्स्टास 27 धावांवर खेळत होता. त्यानं पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहला दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. तो अर्धशतक झळकावून रवींद्र जडेजाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.
हेही वाचा –
‘अरे जैस्सू, गल्ली क्रिकेट खेळतोय…’, क्षेत्ररक्षणा दरम्यान रोहित शर्मा जयस्वालला झापला, पाहा VIDEO
कॉन्स्टासला धक्का मारणं विराटला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई
IND vs AUS: ‘मैदानात लढाई पण…’, सॅम कॉन्स्टास विराट कोहलीचा ‘बडा चाहता’