आजकाल क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडूंचा स्टंप माईकमधील आवाज बऱ्याचदा ऐकू येतो. पण यामुळे खेळाडूंच्या मैदानावरील बोलण्यावरही बंधने येऊ लागली आहेत, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
मांजरेकर यांनी याबद्दलचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “स्टंपमाईकचा आवाज प्रत्येकवेळी चालू असल्याने आमचे लक्ष क्रिकेटपासून नेहमी विचलित होते. हे खेळासाठी चांगले नाही.”
Keeping the stump mic volume up all the time will ensure that our attention is constantly taken away from the cricket. Not good for the game.#ICC#TurnTheMicsDown
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 12, 2018
तसेच मांजरेकर यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या स्तंभातही याबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. त्यांनी या स्तंभात आत्ताच्या खेळाडूंच्या स्वातंत्र्याबद्दल लिहिले आहे की, ” काही वर्षांपूर्वी मैदान हे खेळाडूंसाठी अनेक अर्थांनी व्यक्तिगत ठिकाण होते. खेळाडूंना माहित होते की त्यांच्या हालचालींवर लक्ष आहे, पण तरीही त्यांना जे हवे ते बोलण्याचे स्वातंत्र्य होते.”
“त्यांचे बोलणे हे त्यांच्या संघातील खेळाडूंमध्येच असायचे आणि जर प्रतिस्पर्धी खेळाडूला काही बोलायचे असेल तर ते पंचांना ऐकू जाणार नाही अशाप्रकारे बोलले जायचे. जरी आयसीसीच्या मार्गदर्शन तत्वानुसार एकदा चेंडू डेड झाला की स्टंप माईकचा आवाज कमी करायचा असतो, असे असले तरी काही प्रसारक स्टंप माईकचा आवाज कायम पूर्ण आवाजात चालूच ठेवतात. त्यामुळे खेळाडूंचे बोलण्याचेही स्वातंत्र्य कमी झाले आहे.”
भारतीय चाहत्यांनी बऱ्याचदा एमएस धोनीचा मैदानातील आवाज स्टंपमाईक मधून ऐकला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कॅप्टन कूल असणाऱ्या धोनीला मनीष पांडेवर चिडलेले चाहत्यांनी पहिले होते तसेच ऐकले होते. त्याचा मनीषवर चिडून बोललेला आवाज स्टंपमाइकमुळे सर्वांना ऐकू आला होता आणि त्यामुळे बराच काळ धोनी चर्चेत होता.
याबद्दलही मांजरेकरांनी त्यांच्या स्तंभात लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “तुम्हाला माहीत आहे का सर्वात जास्त आश्चर्यकारक काय होते? दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मागील कसोटी सामन्यात मैदानात जे काही बोलले जात होते ते सर्व आम्हाला घरी बसून ऐकू येत होते आणि मैदानावरील पंचांना ते नंतर कळत होते.”
“ज्या गोष्टी आम्हाला सामना बघून ऐकू येत होत्या त्यातील अर्ध्या गोष्टीही पंचांना ऐकू येत नव्हत्या. कारण त्यांनी आमच्यासारखा स्टंपमायक्रोफोन घातला नव्हता. नक्कीच हे बरोबर नाहीये. मध्ये एक व्हिडीओ आला होता ज्यात दक्षिण आफ्रिकेत एम एस धोनी मनीष पांडेला काहीतरी म्हणत होता. त्यातील भाषाने तुम्हाला दुखावले.”
त्यांनी या स्तंभात शेवटी लिहिले आहे की, ” एकदा की चेंडू डेड झाला की स्टंपमाइकचे काही काम नसते. हे फक्त आपल्या मनोरंजनासाठी आपल्याला काही विषय देते. त्याचा खेळ वाढविण्यासाठी किंवा त्याचे कव्हरिंग करण्यासाठी काही उपयोग होत नाही. अशी एक प्रकारची भाषा आहे जी फक्त क्रिकेट मैदानावर वापरली जाते, ती बाकी कोणासाठीही नसते. क्रिकेटपटूंना ऐकण्यापेक्षा बघणे चांगले आहे.”