आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. त्यापूर्वी अनेक क्रिकेट जाणकार आपापली टीम निवडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी देखील आयसीसीच्या या मेगा इव्हेंटसाठी आपली 15 सदस्यांची भारतीय टीम निवडली.
संजय मांजरेकरांची टीम पाहिल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना खूप मोठा धक्का बसेल. मांजरेकरांनी आपल्या संघात स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीला स्थान दिलेलं नाही. शिवाय त्यांच्या टीममध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेलाही स्थान नाही. तसेच त्यांनी फिनिशर म्हणून रिंकू सिंहला निवडलं नाही. महत्त्वाचं म्हणजे, संजय मांजरेकर यांच्या या टीममध्ये दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
संजय मांजरेकर यांनी भारताच्या टी20 विश्वचषक संघात फलंदाज म्हणून रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. त्यांनी आपल्या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजाला स्थान दिलंय. त्यांच्या संघात एक आश्चर्यकारक नाव आहे, ते म्हणजे क्रुणाल पांड्या याचं. धक्कादायक म्हणजे, संजय मांजरेकर यांनी आपल्या संघात स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला स्थान दिलेलं नाही. शिवाय आयपीएलच्या या हंगामात शानदार प्रदर्शन करणाऱ्या शिवम दुबेकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं आहे.
संजय मांजरेकर यांनी आपल्या संघात 7 गोलंदाजांची निवड केली, ज्यामध्ये 2 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षित राणा आणि मयंक अग्रवाल हे 5 वेगवान गोलंदाज आहेत. तर फिरकीपटू म्हणून त्यांनी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान दिलंय.
संजय यादवचं हे टीम सिलेक्शन थोडं धक्कादायक आहे, ज्यावरून आता त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांनी मयंक यादवला आयपीएलमधील केवळ दोन सामन्यांतील कामगिरीच्या आधारे निवडलं. तर दुसरीकडे, या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला मात्र त्यांनी स्थान दिलं नाही.
संजय मांजरेकर यांनी टी20 विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षित राणा, मयंक यादव, क्रुणाल पांड्या
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही…”, आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर नाराज पॅट कमिन्सची प्रतिक्रिया
किंग कोहलीचा मोठा विक्रम ! ‘अशी’ कामगिरी करणारा विराट एकमेव खेळाडू, वाचा कोहलीच्या खास विक्रमाबद्दल…