मेलबर्न कसोटीनंतर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रिषभ पंतवर जोरदार टीका केली होती. गावस्कर यांनी रिषभ पंतनं खेळलेल्या शॉटला मूर्खपणाचं म्हटलं होतं. त्यानंतर आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मांजरेकर यांनी रिषभ पंतला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, आपण त्याच्या अपयशावर लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या शॉट सिलेक्शनवर नाही.
संजय मांजरेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, “42 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं (रिषभ पंत) सहा शतकं आणि सात वेळा 90 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो एक महान खेळाडू आहे जो पुरेशा धावा काढत नाही. हेच याचं सार आहे.” वास्तविक, संजय मांजरेकर यांची ही पोस्ट सुनील गावस्कर यांना दिलेलं प्रत्युत्तर मानली जात आहे, ज्यांनी अलीकडेच मेलबर्न कसोटीत भारतीय संघाच्या पराभवानंतर रिषभ पंतवर जोरदार टीका केली होती.
रिषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. परंतु त्यानंतर त्यानं जोरदार पुनरागमन केलं. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर त्यानं 2024 टी20 विश्वचषक जिंकला आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या होत्या.
मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारतीय संघाला 184 धावांच्या मोठ्या फरकानं पराभवाला सामोरं जावं लागलं. सध्या ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1 ने पुढे आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी कसोटी सिडनी येथे खेळली जाईल. दोन्ही संघ 5 जानेवारीपासून आमनेसामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा –
रिषभ पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार? पाचव्या कसोटीत बदलू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
आयसीसी क्रमवारीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
2024 साली जगाचा निरोप घेणारे 5 दिग्गज क्रिकेटपटू, 3 भारतीयांचाही यादीत समावेश