जायवस्कीला | जगातील सर्वाधिक लोकप्रिय, आव्हानात्मक अन् वेगवान अशी फिनलंड रॅली पूर्ण करण्यात पुण्याचा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर संजय टकले याने यश मिळविले. जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) ही रॅली रविवारी फिनलंडमध्ये पार पडली. अधिकृत नोंदणी असलेला संजय हा या मालिकेतील रॅली पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला. गटाच्या एकूण क्रमवारीत त्याने 14वे स्थान मिळविले.
संजय डब्ल्यूआरसी 3 गटात सहभागी झाला. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड त्याचा नॅव्हीगेटर होता. बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर 2 कार त्याने चालविली.
रॅली ड्रायव्हर म्हणून एका दशकाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षणानंतर संजय म्हणाला की, जागतिक रॅली मालिकेत सहभागी व्हायचे माझे स्वप्न होते. जगातील सर्वाधिक वेगवान रॅली पूर्ण करण्याचे माझे प्राथमिक उद्दीष्ट होते. मी दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलो याचा आनंद वाटतो.
दुसऱ्या लुपमध्ये सुधारणा कायम
शुक्रवारी पहिला लेग झाला. त्यात संजय 14वा होता. शनिवारी दुसऱ्या लेगमध्ये त्याने एक क्रमांक सुधारणा करीत 13वे स्थान गाठले. त्यानंतर रविवारी तिसऱ्या लेगमध्ये तो 14व्या क्रमांकावर गेला, पण दोन्ही स्टेजेसमध्ये वेळेत सुधारणा करण्यात त्याला यश मिळाले. रविवारी लौका आणि रुहीमाकी 1 एशा दोन स्टेजेस प्रत्येकी दोन वेळा करायच्या होत्या. यात दुसऱ्या लूपला रुहीमाकी ही पॉवरस्टेज होती. लौका स्टेजचे अंतर 11.74, तर रुहीमाकीचे 11.12 किलोमीटर होते. लौकाच्या पहिल्या लूपमध्ये आठ मिनिटे 2.4 सेकंद वेळेत संजयने 7ः59.2 सेकंद अशी सुधारणा केली. रुहीमाकी स्टेजला त्याची वेळ अनुक्रमे आठ मिनिटे 2. सेकंद व 7ः55.9 सेकंद होती.
अनुभवाचा कस
संजयने सांगितले की, दुसऱ्या लूपमध्ये आम्ही सुधारणा करू शकलो हे वेळेवरून स्पष्ट होते. आम्ही एकूण 23 स्टेजेस केल्या. इतक्या प्रदिर्घ रॅलीत भाग घेताना आतापर्यंतच्या अनुभवाचा कस लागला.
सतत वक्र भाग
एकूण अनुभवाविषयी संजयने सांगितले की, दुसऱ्या लूपमधील सुधारणा उत्साहवर्धक आहे. अचूक पेस नोट््सच्या जोडीला एकाग्रतेने ड्रायव्हिंग करणे महत्त्वाचे असते. ही जगातील सर्वाधिक वेगवान रॅली आहे. अत्यंत तांत्रिक अशा ड्रायव्हिंगसाठी रेसिंग लाईन्सच्या बाबतीत अचूकतेची गरज असते. मार्गावर सतत वक्र भाग असतात.
दीड हजार किमी प्रवास
रॅलीचे स्पर्धात्मक अंतर 317.26 किलोमीटर असले तरी चार दिवसांच्या काळात करावा लागणारा प्रवास दीड हजार किलोमीटरच्या घरात असतो. त्यामुळे रोज केवळ पाच तासांची झोप मिळू शकते. अशावेळी तंदुरुस्तीचा कस लागतो. त्यामुळे आगामी काळात या मालिकेतील आणखी काही रॅलींमध्ये भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी व्हावी म्हणून तंदुरुस्तीवर भर देणार असल्याचे संजयने नमूद केले.
बिघाडामुळे परिणाम
रॅलीत संजयच्या कारचा लोअर आर्म दोन वेळा बिघडला. त्यामुळे त्याला सर्व्हिसमध्ये तो बदलून घ्यावा लागला. यात चार मिनिटांचा विलंब झाल्यामुळे पेनल्टी बसली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
-षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ