पुणे, दिनांक 14 सप्टेंबर 2015 ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील (एपीआरसी) जपान रॅलीत वेगवान कारचे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे. मलेशियात स्वतःच्या मालकीच्या मित्सुबिशी मिराज आर5 कारसह पदार्पण केल्यानंतर आवडत्या जपान रॅलीत कामगिरी उंचावण्याबरोबरच रॅलीचे तंत्र आणि मंत्र आत्मसात करण्याची प्रक्रिया तो पुढे सुरु ठेवणार आहे. येत्या शनिवारी-रविवारी ही रॅली जपानमधील होक्कायडो प्रांतात होत आहे.
एम्पार्ट संघाचे प्रतिनिधीत्व करताना संजयने यंदा आशिया करंडकाच्या फेऱ्यांमध्येच भाग घ्यायचे ठरविले. मलेशियात शनिवारी अखेरच्या स्टेजला त्याची कार रस्त्यालगत खोलगट भागात अडकली. त्यामुळे रिस्टार्ट करावी लागल्यानंतरही संजयने जपानची नॅव्हीगेटर नोरीको ताकेशिता हिच्या साथीत मलेशियन राष्ट्रीय रॅलीत अव्वल कामगिरी केली.
जपानमध्ये दाखल झालेल्या संजयने बुधवारी टेस्टींग, तर गुरुवारी रेकी पूर्ण केली. टेस्टींगविषयी तो म्हणाला की, आम्ही सर्वप्रथम प्रारंभ केला. कारचा अनुभव चांगला होता. ही कार अधिकाधिक चालविणे महत्त्वाचे आहे.
संजयने रेकीविषयी सांगितले की, यंदा एकच नव्या स्टेजचा समावेश आहे. खास करून जंगल परिसरातील स्टेजचा मार्ग अरुंद आणि निसरडा आहे. आम्ही गुरुवारी रेकी पूर्ण केली.
संजयने एम्पार्ट संघाविषयी सांगितले की, थॉमस वेंग हे संघाचे प्रमुख आहेत. ग्रॅहॅम मिडीलटन माझे प्रशिक्षक आहेत. हे दोघे मलेशियात होते. आता ते येथे सुद्धा आले आहेत. मलेशियातील जोहोर बारूमध्ये कार थेट रॅलीमध्येच चालवावी लागली. त्यामुळे कारशी जुळवून घेता आले नाही. यावेळी पुरेशी तयारी झाली आहे. मी कायम रॅली पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा वेगळा दृष्टिकोन नसेल.
होक्कायडोमधील शेतीप्रधान भागात रॅलीचा मार्ग असतो. कच्या मातीच्या रस्त्यावर मध्ये सिमेंटचे पाईप असतात. ते जमिनीखाली असतात, पण वेगवान कार जाऊन त्यावरील माती निघून जाते. अशावेळी अंदाज चुकल्यास पाईपला धडकून टायर पंक्चर होणे किंवा कारचे नुकसान होण्याची शक्यता असते. ही कार जास्त वेगवान असल्यामुळे हे आव्हान जास्त खडतर आहे, असे संजयने सांगितले.
गतवर्षी संजयने प्रॉडक्शन करंडक गटात दुसरा क्रमांक मिळविला होता. एपीआरसी नोंदणीकृत स्पर्धकांमध्ये तो चौथा आला होता. गटात न्यूझीलंडचा मायकेल यंग विजेता ठरला होता. गेल्या वर्षापर्यंत संजय जपानच्या कुस्को संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. नोरीको ही सुद्धा जपानची आहे. ती सोप्पोरोचीच रहिवासी आहे. तिच्या टीप्स त्याला नेहमीच उपयुक्त ठरतात.
यंदा रॅलीचे 16वे वर्ष आहे. तोकाची प्रांतात होणाऱ्या रॅलीच्या आयोजनात ओबिहीरो शहराच्या महापौरांचा जातीने पुढाकार असतो. याशिवाय इतरही तीन शहरांचा संयोजनात सक्रीय सहभाग असतो. त्यामुळे जोरदार वातावरणनिर्मिती होते. जपानवासी रेसिंगमधील रॅलीवर विशेष प्रेम करतात. आणखी एक उल्लेखनीय मुद्दा म्हणजे संजयचे येथे असंख्य चाहते आहेत. त्याच्या नावाची पोस्टर्स घेऊन अनेक जण विविध स्पेक्टेटर पॉइंंट्सवर थांबलेले असतात.
गेल्या वर्षी तोकाची परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे पूर्वतयारीत बराच अडथळा आला होता. त्यानंतरही तब्बल 38 हजार प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदविली. जपानमधील ही एकमेव आंतरराष्ट्रीय रॅली असल्यामुळे देशाच्या इतर भागांमधूनही नागरीक येतात. ओबीहिरोचे महापौर यॉनेजावा नोरीहिसा यांनी सांगितले की, साऱ्या देशाला या रॅलीची प्रतिक्षा असते. इतक्या वर्षांच्या संयोजनामुळे आमच्या गाठीशी बहुमोल अनुभव जमा झाला आहे. आम्ही वर्षागणिक सरस संयोजनासाठी प्रयत्नशील असतो. या रॅलीच्या निमित्ताने प्रेक्षक, संघाचे तंत्रज्ञ, पदाधिकारी आणि अर्थातच स्पर्धक नव्या चाहत्यांच्या संपर्कात येतात. त्यातून त्यांना मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याची संधी मिळते. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या परिसरातील खाद्यपदार्थ, कृषी आणि मत्स्योद्योग अशा गोष्टींचे प्रवर्तन करतो. सर्व्हिस पार्कवरील आदरातिथ्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
सप्टेंबर महिन्यात येथील सरासरी तापमान 16 अंश सेल्सियस असते. मुख्य म्हणजे 12 तास सूर्यप्रकाश असतो. याचा फायदा घेत यंदा पाच स्टेजेसच्या ठिकाणी स्पेक्टेटर पॉइंट््स उभारण्यात आले. रिकूेत्सू, सॅमी सात्सुनाई (ओबीहिरो), होनबेत्सू, ओतोफुके व पॅवसे कामुय (ओशोरो) अशा ठिकाणी चाहत्यांना रॅलीचा थरार याची देही याची डोळा अनुभवता येईल.
चाहत्यांच्या प्रेमाची प्रचिती
रेकीदरम्यान संजयच्या कारचे चाक पंक्चर झाले. त्या स्टेजमधून संजयची कार बाहेर येताच तेथे थांबलेल्या जपानी जोडप्याने धाव घेतली. शिमीझी गाकुजी यांनी त्यांच्या पत्नीसह मदत केली. आपल्या कारमधून जॅक आणि स्पॅनर काढला. ते संजयच्या कारपाशी आले. संजय त्याच्या कारमधून जॅक बाहेर काढण्यापूर्वीच त्यांनी आपला जॅक
बसविला आणि कार वर उचलण्यास सुरवात केली. यातील पुरुषाने स्वतः चाक बदलण्याचे काम पूर्ण केले. त्यांनी संजयला अजिबात काम करू दिले नाही. हे जोडपे गेल्या चार वर्षांपासून दरवेळी रॅलीदरम्यान एका आठवड्याची सुट्टी घेते. याशिवाय इतर चार तरुणांचा एक ग्रुपही संजयला प्रोत्साहन द्यायला नेहमीच उपस्थित असतो.