पुणे: थायलंडमधील टीडब्लूसी रॅली मालिकेत दुसरा क्रमांक पटकावत पुण्याचा रॅली ड्रायव्हर संजय टकले याने विजयी पुनरागमन केले. त्याने टी3 गटात ही कामगिरी केली.
चार फेऱ्यांच्या मालिकेतील पहिली फेरी शनिवारी-रविवारी चाचोएंगसाओ प्रांतात पार पडली. संजयने डेलो स्पोर्टस संघाकडून भाग घेतला. त्याने इसुझू युटिलीटी ही गाडी चालविली. थायलंडचा थान्याफात मिनिल त्याचा नॅव्हीगेटर होता.
रॅलीच्या आव्हानाविषयी संजयने सांगितले की, क्रॉस कंट्री स्वरुपाची रॅली होती. तेथे तुम्हाला आधी मार्गाची रेकी करण्याची परवानगी नसते. त्यामुळे पेस नोट््सही काढता येत नाहीत. थायलंडमधील 4 बाय 4 मालिकेत रेकी करता येते. हे स्वरुप मात्र डकारसारखे असल्यामुळे केवळ रोड बुक दिले जाते, ज्यावर किमान खुणा आणि चिन्हे असतात.
शनिवारी उद््घाटनानंतर पहिली स्टेज 34 किलोमीटरची होती. रविवारी अनुक्रमे 26 आणि 52 किलोमीटरच्या स्टेज होत्या. पहिल्या दिवशी रॅली सुरु करून जेमतेम एक किलोमीटर अंतर पार होते तोच टेर्राट्रीप यंत्रणा बिघडली. ड्रायव्हर आणि नॅव्हीगेटर यांच्यातील संवादाची तसेच ट्रीपमीटरची ही यंत्रणा असते. ती नादुरुस्त झाल्यामुळे संजयला वेग कमी करून दिशादर्शक खुणांचा आधार घ्यावा लागला. परिणामी वेळ गेला. या गटातील कारमध्ये काही तांत्रिक बदल करावे लागतात. त्यामुळे मुळ इंजिनच्या तुलनेत गाडीची पॉवर कमी होते. त्यातच गाडीचे मॉडेल जुने होते. याशिवाय मार्ग खडतर असल्यामुळे ड्राईव्ह करणे आणखी अवघड बनले होते. यानंतरही पहिल्या दिवशी संजयने गटात तिसरा, तर एकूण क्रमवारीत 14वा क्रमांक पटकावला.
दुसऱ्या दिवशी 26 किलोमीटर स्टेजदरम्यान उताराचा भाग असल्याचे मिनिलने संजयला इंटरकॉमवरून सांगितले. प्रत्यक्षात नदीच्या पात्रातील खोलगट भागाचे वळण होते. तेथे वेगाने आल्यामुळे दोघांच्या पाठीला आणि पोटात जोरात हादरा बसला. त्यानंतर वेदना होत असूनही संजयने रॅली सुरु ठेवली. यात गाडीच्या गिअर बॉक्समध्ये बिघाड होऊन 4 बाय 4 यंत्रणा बिघडली होती. केवळ मागील चाकांना पॉवर मिळत होती. यानंतरही संजयने प्रतिकुल परिस्थितीत गाडी चालवित स्टेज पूर्ण केली.
त्यानंतर ब्रेक होता आणि मग 52 किलोमीटरची सर्वांत मोठी स्टेज स्पर्धकांना पूर्ण करायची होती. ही स्टेज सर्वाधिक अंतराप्रमाणेच मार्गाच्या बाबतीतही खडतर होती. चिखलामुळे निसरडे भाग तसेच पाण्याने भरलेले खोलगट क्रॉसिंग ठिकठिकाणी होती. अशी स्टेज केवळ मागील चाकांना पॉवर मिळत असताना पूर्ण करण्याची जिगर संजयने दाखविली. त्यासाठी सरळ मार्गावर तसेच वळणावळणाच्या मार्गावर त्याने जागतिक रॅली मालिकेतील अनुभव आणि कौशल्य पणास लावले. कार स्लाईड करीत त्याने ही स्टेज पूर्ण केली.
एकूण कामगिरीबद्दल संजयने सांगितले की, मी जवळपास अडीच वर्षांनी रॅलीत सहभागी झालो. या कालावधीत अशा कार चालविण्याचा अजिबात सराव नव्हता. त्यामुळे ही रॅली कमालीची आव्हानात्मक ठरली. हा विजय मिळाला असला तरी आता 2019 मधील दर्जा गाठण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागेल याची मला कल्पना आहे.
निकाल ः
टी3 गट ः 1) अनुचा-नोम्फसीन, 2) संजय टकले-थान्याफात मिनील, 3) विचावत-सोनलाहानात
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार






