IND vs SL, 1st T20 Match :- भारतीय क्रिकेट संघाने शनिवारपासून (27 जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेचा श्रीगणेशा केला आहे. पल्लेकल्ले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उभय संघातील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यष्टीरक्षक संजू सॅमसन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु कर्णधार सूर्यकुमार यादव याने संजूला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी संजू नेट्समध्ये यष्टीरक्षणाचा भरपूर सराव करताना दिसला होता. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक टी दीपिल यांच्याबरोबर हातात ग्लोव्ह्ज घालून यष्टीमागे विकेट घेण्याचा सराव करतानाचा संजूचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध सलामीच्या टी20 सामन्यात संजू यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल, अशी क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्यकुमारने यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला पहिली पसंती दर्शवली.
29 वर्षीय संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असून यष्टीरक्षणाची जबाबदारीही त्याच्याच खांद्यावर आहे. त्याने आयपीएलमध्ये यष्टीमागे चपळता दाखवताना आतापर्यंत 75 फलंदाजांना बाद केले आहे. टी20 विश्वचषकानंतर झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत तो प्रमुख यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता. या मालिकेत यष्टीमागे त्याची कामगिरी चांगली राहिली होती. तसेच फलंदाज म्हणूनही त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. शेवटच्या टी20 सामन्यात त्याने अर्धशतकही झळकावले होते. मात्र श्रीलंकेविरुद्ध यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा संघात समावेश असल्याने संजूला दुर्लक्षित करण्यात आले.
तसेच श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमद यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकले नाही. संजू सॅमसन आणि शिवम दुबे 2024च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेतही त्यांनी प्रभावित केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेत मालिकावीर ठरलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही प्लेइंग 11 मधून बाहेर ठेवण्यात आले आहे.
पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
महत्त्वाच्या बातम्या-
हँडबॉलपटूने हॉकी खेळाडूला सर्वांसमोर केले ‘फिल्मी स्टाईल प्रपोज’, पाहा व्हिडिओ
“सेक्स बेडरुमपर्यंत मर्यादित का राहू शकत नाही?” ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यावरून भडकली कंगना
जो रुटचा धमाका, कसोटीमध्ये ब्रायन लाराचा विक्रम मोडला; आता बारी सचिनची!